Breaking News

राज्यपालांचे अभिभाषण हे संघ कार्यकर्ता म्हणून की राज्यपाल म्हणून ?

संतप्त  सवालानंतर विरोधकांचा बहिष्कार

मुंबई : प्रतिनिधी

राज्यपाल हे पद घटनात्मक असतांना राज्याचे राज्यपाल सी.विद्यासागर यांनी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आजचे त्यांचे अभिभाषण हे राज्यपाल म्हणून राज्याच्या हिताचे असेल की संघाचा कार्यकर्ता म्हणून संघाचा अजेंडा राबवणारे ? असा खोचक सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी करत याबाबत शंका असल्याने आम्ही अभिभाषणावर बहिष्कार घालत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

 अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांनी बहिष्कार घालत गांधी हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है… आरएसएसचं समर्थन करणाऱ्या राज्यपालांचा धिक्कार असो… अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायरीवर बसून घोषणाबाजी सुरु केली.

यावेळी विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, विधानसभेतील मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे, विधान परिषदेतील मुख्य प्रतोद आमदार हेमंत टकले, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार विक्रम काळे, आमदार विदया चव्हाण, आमदार ख्वाजा बेग, आमदार प्रकाश गजभिये, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार गणपतराव देशमुख, आमदार अनिकेत तटकरे, आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार हसन मुश्रीफ, आमदार ज्योती कलानी, आमदार श्रीमती सुमनताई पाटील, आमदार श्रीमती संध्याताई कुपेकर आदींसह कॉंग्रेस, व मित्र पक्षाचे आमदार उपस्थित होते. 

विरोधी पक्ष सरकारविरोधात पहिल्याच दिवशी आक्रमकपणे लढा देणार असल्याचे आपल्या कृतीतून दाखवून दिले असल्याने अधिवेशनामध्ये वेगळीच रंगत पाहायला मिळणार आहे.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *