Breaking News

जल पर्यटन प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यावरण पूरक विकास आणि स्थानिकांना रोजगार

कोयना जल पर्यटन केंद्र हे देशातील गोड्या पाण्यातील सर्वात मोठे जल पर्यटन केंद्र असून या माध्यमातून पर्यावरण पूरक विकास आणि स्थानिकांना रोजगार या बाबींना प्राधान्य देण्यात येणार आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथे कोयना जलाशय (शिव सागर) तीर येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना जल पर्यटनाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, ज्येष्ठ सिने अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, एमटीडीसीच्या व्यवस्थापक श्रध्दा जोशी शर्मा, जलसंपदा विभागाचे अरुण नाईक आणि जयंत शिंदे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सल्लागार सारंग कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सह्याद्रीच्या कुशीत प्रचंड निसर्ग सौंदर्य लपलेले आहे. त्याला चालना देण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता होती. त्यासाठी ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट काढल्याने या परिसराच्या विकासाला चालना मिळाली आहे. मासेमारी, बोटिंग, जल पर्यटन यासाठी या बाबीचा फायदा होणार आहे. मात्र विकास करत असताना तो कोणत्याही परिस्थितीत पर्यावरण पूरक असला पाहिजे. पाणी प्रदूषित होता कामा नये. तसेच स्थानिक लोकांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे अशा सूचना पर्यटन विभागाला आपण दिल्याचेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले. जल पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास मोठा वाव आहे.

स्थानिक बोट व्यावसायिकांना बोट खरेदीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या भागाच्या विकासासाठी मुख्यमंत्री स्वयंरोजगार प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. आपटी ते तापोळा तसेच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा रघुवीर घाटातील रस्ता या बाबीही प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, रोजीरोटीसाठी गावापासून आई-वडिलांपासून, कुटुंबापासून, तरुणांना दूर जावे लागते. त्यांना रोजगारासाठी गाव सोडून जावे लागू नये, उलट गाव सोडून गेलेले पुन्हा आपल्या घरी यावेत, त्यांना स्थानिक स्तरावरच रोजगार उपलब्ध व्हावेत हा आपला उद्देश आहे. विकासात्मक काम करणारे शासन असल्यामुळे राज्यात अनेक पायाभूत प्रकल्प सुरू आहेत. एक लाख ३७ हजार कोटीचे प्रकल्पांचे दावस येथील उद्योग परिषदेमध्ये करार झाले आहेत. तीन लाख ९३ हजार कोटींचे उद्योग राज्यात येत आहेत. पाच लाख कोटींची गुंतवणूक आपण राज्याच्या विकासासाठी आणली आहे. उद्योग वाढीसाठी उद्योगांना सर्वतोपरी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणाले की, जल पर्यटन प्रकल्पामध्ये स्थानिकांनाच रोजगार मिळावा, त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, मुनावळे गावचे सातबारे खातेदारांच्या नावावर करून मिळावेत, अन्य उर्वरित रखडलेले प्रकल्पही मार्गी लावावेत, जलाशयात मासेमारीचे परवाने मिळावेत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस पर्यटन विकास विभागाच्या कोयना जल पर्यटन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांच्यासह अन्य मान्यवरांनी काउंटरवर तिकीट खरेदी केले. या कार्यक्रमात स्थानिक तरुणांना प्रातिनिधीक स्वरूपात रोजगाराची नियुक्तीपत्रे देण्यात आली.

कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, सरपंच भोसले, विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *