Breaking News

विधान भवनातील शिवसेना कार्यालयातून शिंदे गटाने ठाकरे गटाला बाहेर काढले नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात शिंदे गटाच्या आमदारांची दांडगाई

शिवसेना नेमकी कोणाची याचा वाद जरी सध्या सर्वोच्च न्यायालयात आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जरी अद्याप प्रलंबित असला तरी नागपूरातील गारठलेल्या वातावरणात शिवसेनेतील शिंदे गटात आणि ठाकरे गटात चांगलीच जुंपल्याने थंडीच्या वातावरणातही विधानभवनातील वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाह्यला मिळाले. त्याचे झाले असेल की, आज हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस असल्याने जरा जास्तच लगबग सुरु होती. मात्र सकाळी ११ नंतर अचानक शिंदे गटातील सर्व आमदार, मंत्री हे विधानभवन परिसरातील शिवसेनेच्या जून्या कार्यालयाकडे गेले आणि तेथील ठाकरे गटाने नेमलेल्या जून्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करत त्यांचे सामान कार्यालयातून बाहेर काढले. आणि कार्यालयाच्या बाहेर बाळासाहेबांची शिवसेना असा फलक लावून टाकला. त्यामुळे शिंदे गटाने ठाकरे गटाला बाहेर काढल्याचे चित्र पाह्यला मिळाले.

जुने कार्यालय एकनाथ शिंदे गटाला मिळाल्यावर उद्धव ठाकरे गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे असलेले दुसरे कार्यालय देण्यात आले. दरम्यान, मूळ शिवसेनेच्या व नंतर शिंदे गटाला मिळालेल्या कार्यालयातून जुन्या कर्मचाऱ्यांनाही बाहेर काढल्यावर या कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवन परिसरात सुरुवातीला शिवसेनेच्या एकाच कार्यालयात उध्दव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाचे कार्यालय असल्याचे दृश्य दिसत होते. यावेळी एका खोलीत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेसह उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचेही चित्र लागले होते. दरम्यान, दुपारी जुने कार्यालय एकनाथ शिंदे गटाला मिळाले, तर उद्धव ठाकरे गटाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागील भागातील दुसरे कार्यालय देण्यात आले. या कार्यालयातील जुने कर्मचारी दरवर्षीप्रमाणे जुन्या कार्यालयात आपले काम करत होते. नेहमीप्रमाणे यंदाही हे कर्मचारी शिवसेनेच्या कार्यालयात काम करीत होते. मात्र या कार्यालयावर शिंदे गटाने ताबा घेतला व या कर्मचाऱ्यांनाही कार्यालयातून बाहेर काढले.

त्यात दोन महिला व चार पुरुष कर्मचाऱ्यांचा समावेश होता. शेवटी हे कर्मचारी उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या कार्यालयात आले. येथे आमदार रवींद्र वायकर यांची भेट घेतली. यावेळी कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांनी या कर्मचाऱ्यांचे सांत्वन केले. नंतर पत्रकारांशी बोलताना रवींद्र वायकर म्हणाले, गेल्या तीस वर्षांपासून या कर्मचाऱ्यांनी एकनाथ शिंदेसह सर्व सेना आमदारांची सर्व कामे केली. आता शिंदे यांनी वेगळी चूल मांडल्यावर त्यांना रडवून बाहेर काढणे कुणालाही शोभणारे नाही. ही मानवी वृत्ती नाही, असे वायकर म्हणाले. यावेळी त्यांनी सहाही कर्मचाऱ्यांच्या जेवणाची सोय ठाकरे गटाला मिळालेल्या नवीन कार्यालयात करण्याची सूचना केली. यादरम्यान एकनाथ शिंदे गट कार्यालयात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र काढून तेथे आनंद दिघे यांचे छायाचित्र लावण्यात आले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यासाठी १३ मे रोजी या मतदारसंघात मतदान

राज्यात लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यातील अकरा मतदार संघासाठी १३ मे रोजी मतदान होत असून असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *