Breaking News

सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील नाराजांची नावे घेत राणे बंधूवर साधला निशाणा

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तास्थानी विराजमान होऊन जवळपास चार महिने झाले. या चार महिन्यात फक्त एकदाच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे शिंदे गटाबरोबर भाजपामधील अनेक आमदारांचे लक्ष्य लागलेले आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील अनेक आमदारांना पहिल्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही म्हणून आधीच नाराज आहेत. तसेच राज्यमंत्रीचीही अद्याप नियुक्ती झाली नाही. या साऱ्या घडामोडींवर उध्दव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील नाराजांची नावे घेत चांगलाच निशाणा सांगत नितेश आणि निलेश राणे यांनी केलेल्या टीकेलाही चांगलेच प्रत्युत्तर दिले.

उद्धव ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे यांनी या अनुषंगाने म्हणाल्या की, राज्यात २०२३ सालात मध्यावधी निवडणुका लागणार आहेत. शिंदे गटातील अनेक नेते नाराज आहेत, असेही त्या म्हणाल्या. त्या नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, नाशिकमधील सुहास कांदे नाराज आहेत. औरंगाबादेतील संजय शिरसाट हे नाराज आहेत. शिंदे गटातील नाराजांची संख्या फार मोठी आहे. ज्या-ज्या लोकांना घेऊन गेले होते, त्या सर्वांनाच मंत्रीपदाची गाजरं दाखवण्यात आली होती. मात्र या सर्वच लोकांना संतुष्ट करणे एकनाथ शिंदे तसेच भाजपाला अशक्य आहे. भाजपाची स्थिती घरचं झालं थोडं आणि व्याह्याने धाडलं घोडं, अशी झाली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार बडबड करत मुख्यमंत्र्यांच्या दालनातून बाहेर आले होते. त्यांचा हा व्हिडीओ सर्वांनीच पाहिला असेल. प्रताप सरनाईक हे देखील मुख्यमंत्र्यांवर चिडले होते. प्रताप सरनाईक, गीता जैन आणि नरेंद्र मेहता या तीन नेत्यांनी मीरा भाईंदरमध्ये पालिकेच्या एका बैठकीत एकमेकांना बसायला खुर्च्या दिल्या नाही. त्यामुळे २०२३ साली मध्यावधी निवडणुका लागतील हे नक्की, असेही म्हणाल्या.

 

एका जुन्या व्हिडीओचा आधार घेत भाजपाचे नेते नितेश राणे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली. या टीकेलाही अंधारे यांनी प्रत्युत्तर देत म्हणाल्या, आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगावू आहेत. नारायण राणे यांनी त्यांना चांगले संस्कार दिले नाहीत. तो व्हिडीओ २० वर्षापूर्वीचा जुना आहे. विचारांचे खंडन-मंडन करावे लागते. राणेंच्या मुलांचा अभ्यास कमी आहे. मी त्यांचा कणकवलीत जाऊन होमवर्क घेतल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. त्यांची कानशिल लाल झाली आहेत. त्यामुळे त्यांचे अस्थिर होणं स्वाभाविक आहे, असा खोचक टोलाही त्यांनी नितेश राणे आणि निलेश राणे यांना लगावला.

सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हणाल्या, गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कुचकामी ठरल्याचं वारंवार सिद्ध होत आहे. फडणवीसांना विसर पडतो की ते राज्याचे गृहमंत्री आहेत. मात्र, ते एका पक्षाचे पदाधिकार आणि गृहमंत्री असल्यासारखे वागतात, अशी टीका केली.

देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटातील काही लोक स्वातंत्र्यवीर यांच्या मुद्द्यावरून अत्यंत आक्रमक होतात. तीच लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तलवारी म्यान करून चकार शब्द काढत नाहीत. त्यामुळे भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल आहे की भाजपाचे पूर्णवेळ कार्यकर्ते, याचं उत्तर दिलं पाहिजे. कारण भगतसिंह कोश्यारी ठरवून बदनामी करतात, असा आरोपही त्यांनी केला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *