Breaking News

राष्ट्रवादीची कृषी दिंडी म्हणजे ‘सौ चूहे खा के…

अनेक वर्षे विदर्भावर अन्याय करून आणि विदर्भातील शेतकऱ्याची उपेक्षा करून आता विदर्भात कृषी दिंडी काढायला निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा इरादा म्हणजे, ‘सौ चूहे खा के असा प्रकार आहे, अशी टीका प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने अशी दिंडी काढावीच, म्हणजे वर्षानुवर्षे विदर्भातील शेतकऱ्यावर केलेल्या अन्यायाचा पाढा या नेत्यांच्या तोंडावर वाचण्याची संधी विदर्भवासी जनतेला मिळेल, असे आव्हानही त्यांनी दिले.

महाराष्ट्राच्या सीमेवरून भारत जोडो यात्रा करून परतलेल्या राहुल गांधींच्या यात्रेनंतर आता अशी कृषी दिंडी काढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला विदर्भातील जनता थारा देणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करून विदर्भावर केलेल्या अन्यायाचे चटके विदर्भातील जनता विसरलेली नाही. आपला जिल्हा आणि मतदारसंघाच्या विकासापलीकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विदर्भाच्या द्वेषापोटी कृषी आणि विकासाचा निधीदेखील आपल्या जिल्ह्यांत वळविला, विदर्भातील सिंचनाचे प्रकल्पही आपल्या भागात वळविले आणि समस्याग्रस्त विदर्भातील शेकडो शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या. आपल्या भागातील ऊस कारखानदारीसाठी शेकडो कोटी रुपयांची खैरात करणाऱ्या व त्यासाठी सहकार क्षेत्राला वेठीस धरणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीने विदर्भातील सोयाबीन, धान, कापूस, गहू अशी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यास वाऱ्यावर सोडले. विदर्भातील शेतकऱ्याचे जीवनमान उंचावू नये, तेथील शेतकरी सधन होऊ नये यासाठी सत्तेवर असताना राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेली सापत्न वागणूक विदर्भ विसरलेला नाही, असेही उपाध्ये म्हणाले. विदर्भात निर्माण होणारी वीज विकून आपल्या राजकारणाची पोळी भाजून घ्यायची आणि विदर्भाच्या तोंडाला पाने पुसायची हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळातील धंदा विदर्भाने अनुभवला आहे, असेही त्यांनी म्हटले.

काँग्रेसला वाचविण्यासाठी राहुल गांधी देश जोडावयास निघाले, तेव्हा काँग्रेसमधील एकएक नेता पक्षापासून तुटत होता. राष्ट्रवादीची स्थितीदेखील तशीच झाली आहे. भ्रष्टाचार आणि दहशतवादास खतपाणी घालणारे नेते तुरुंगात आहेत, अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत, अनेकांच्या चारित्र्याचे धिंडवडे निघाले आहेत. अशा पक्षाला यात्रा आणि दिंड्या काढून जनाधाराचे पुण्य मिळणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *