Breaking News

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून दोन कट्टर राजकिय शत्रू एकत्र भाजप विरोधासाठी शिवसेनेची आंबेडकरवाद्यांपाठोपाठ आता डाव्यांना मदत

मुंबई : प्रतिनिधी

एकेकाळी मुंबईतील लाल बावटा अर्थात डाव्यांचा राजकिय वरचष्मा संपविण्यासाठी शिवसेनेने जंगजंग पछाडले. त्यात त्यांना चांगल्यापैकी यशही मिळाले. त्यामुळे मुंबईसह राज्याच्या राजकारणात नेहमीच विळ्या भोपळ्याचे नाते शिवसेना आणि डावे यांच्यात राहीले. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आणि भाजप विरोधासाठी लाल बावट्याच्या साथीला आता शिवसेनाही धावली असल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे.

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर विधानसभेवर डाव्यांच्या लाल बावटा अर्थात किसान सभेकडून मोर्चा काढण्यात आला आहे. हा मोर्चा विधानसभेवर सोमवारी धडकणार आहे. सध्या हा मोर्चा मुंबईत पोहोचला असून आज दिवसभरात विधानभवनाच्या जवळ पोहोचेल. त्यानंतर उद्या सकाळी तो विधान भवनावर धडकणार आहे.

मुंबईतील गिरणगांवावर असलेले राजकिय वर्चस्व उधळून लावण्यासाठी त्याकाळी लाल बावट्यांच्या अनेक कार्यालयांवर शिवसेनेने हल्ले केले. तसेच गिरणी कामगारांचा डाव्यांनी पुकारलेले संपही मोडून काढण्यात शिवसेनेने हातभार लावला. त्यामुळे हळूहळू लाल बावटा मुंबईतून नामशेष झाला. त्याची जागा शिवसेनेने घेत आपले राजकिय वर्चस्व प्रस्तापित केले. त्यावेळी मुंबईतून लाल बावट्याला संपविण्यात शिवसेनेचा हात असल्याची चर्चाही चांगलीच रंगली होती.

मात्र आता केवळ भाजप विरोधासाठी कधी काळी शत्रुत्वाची भावना असणाऱ्या लाल बावट्याच्या मोर्चाला मदत करत मोर्चेकऱ्यांना आवश्यक लागणाऱ्या सोयी-सुविधाही पुरविण्याचे काम केले आहे.

यापूर्वीही डॉ.आंबेडकरवादी दलितांना कधीही ज‌वळ न घेणाऱ्या शिवसेनेने मध्यंतरी शिवशक्ती-भिमशक्तीचा नारा दिला. मात्र त्यात फारसे यश मिळाले नाही. मात्र दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पा़डल्यानंतर डॉ. बाबासाहेबांचे नातू अँड.प्रकाश आंबेडकर यांनी काढलेल्या मोर्चाला शिवसेनेने न मागताच पाठिंबा दिला. तसेच त्यांच्या मोर्चात सहभाग नोंदविला.

साधारणत: दोन वर्षापूर्वी नाशिक येथे याच लाल बावटा अर्थात किसान सभेने शेतकऱ्यांचे आंदोलन छेडत राज्य सरकारच्या विरोधात तब्बल सात दिवसाहून अधिक काळ आंदोलन केले. त्यावेळी शिवसेनेने जाणीवपूर्वक या आंदोलनापासून स्वत:ला दूर ठेवले. मात्र आता किसान सभा लाखोंचा विरोट मोर्चा घेवून विधान भवनावर धडकत असल्याचे दिसताच केवळ भाजप विरोधाला हातभार लावण्यासाठी शिवसेनेकडून मदतीचे पाऊल उचलल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे लाल बावट्यांनीही भाजप सरकारच्या विरोधात एकेकाळचा शत्रु असलेल्या शिवसेनेने पुढे केलेला मैत्रीचा हात हाताच सध्या तरी घेतल्याचे दिसते. मात्र हा हात आगामी निवडणूकीत किती हातात राहतो? याचे उत्तर भविष्यकाळतच मिळेल.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *