Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसंदर्भात थोरात म्हणाले, काही प्रश्न नक्कीच असून… काँग्रेस नेते संध्याकाळी मुख्यमंतत्र्यांच्या भेटीला

मराठी ई-बातम्या टीम

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला असला तरी महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये कुरबुरी अद्यापही सुरुच आहेत. पहिल्या लॉकडाऊनच्या कालावधीतही काँग्रेसच्या आमदारांना निधी वाटपात अन्याय होत असल्याच्या मुद्यावरून आणि बदल्यांबाबतचे अधिकारावरून काँग्रेस नेत्यांनी मातोश्रीवर जावून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेवून आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतरही निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला फारसे स्थान नसल्याचे अनेकवेळा दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेते मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेणार आहे. यासंदर्भात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या संपर्क साधला असता ते म्हणाले की, जरी एका पक्षाचं सरकार असलं तरी अनेक प्रश्न निर्माण होतात आणि मुख्यमंत्र्यांना ते सोडवावे लागतात. आज तीन पक्षांचे सरकार असताना काही प्रश्न नक्कीच आहेत. ते आम्ही आग्रहाने मांडून सोडवून घेणार आहोत.

काँग्रेससोबत दुजाभाव केला जात आहे का? अशी विचारणा केली असता ते म्हणाले, असे काही मी म्हणणार नाही. प्रश्न आहेत हे मात्र आम्ही मान्य करतो. निधीच्या बाबतीतही प्रामुख्याने प्रश्न असून आज ते सोडवले जातील.

त्याचबरोबर राज्यात १० मार्च रोजी राज्यात मोठे फेरबदल होणार असल्याचे भाकित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, १० मार्चनंतर काय बदल होणार आहे याबद्दल पक्षाचे अध्यक्षच सांगू शकतील. तेच याबद्दल स्पष्ट सांगू शकतात. ते नेमकं कशा पद्दतीने बोलले याची मला माहिती नाही.

काँग्रेस नेत्यांचे शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. संध्याकाळी ५ वाजता ही भेट होणार असून यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठीची निवडणूक अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पहिल्याच आठवड्यात होईल, असे संकेत नाना पटोले यांनी दिले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विधानसभा अध्यक्षाची निवड दुसऱ्या आठवड्यात होणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे या बैठकीकडे राज्याच लक्ष आहे.

तपास यंत्रणांचा उपयोग राजकारणासाठी केला जात आहे. कुटुंबातील मुलांपर्यंत, सदस्यांपर्यंत हे राजकारण पोहोचणं महाराष्ट्रातील जनतेला पटणार नाही. संजय राऊत यांचा रोष हा असाच आहे. महाविकास आघाडी टिकू नये यासाठीच हे प्रयत्न सुरु आहेत. भाजपाच्या कार्यपद्धतीविरोधात जो रोष आहे त्याच्यासोबत आम्ही असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *