Breaking News

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, राज्यातील ‘या’ शहरांमध्ये सर्क्युलर इकॉनॉमी पार्कची निर्मिती जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत माझी वसुंधरा 3.0 पुरस्कारांचे वितरण

विकास आणि पर्यावरण संवर्धन व जतन याला राज्य शासनाने महत्व दिले आहे. पर्यावरण पूरक विकासाला राज्य शासनाचे प्राधान्य असून राज्याला लाभलेला सह्याद्री पर्वतरांगा, समुद्र किनारे आणि पश्चिम घाट हा पर्यावरणाचा ठेवा जतन करण्याची सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राज्यातील नागपूर, मुंबई, महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी आणि नाशिक या शहरात सर्क्युलर इकॉनॉमी पार्कची निर्मिती करण्यात येणार असून ग्रीन बॉण्डच्या माध्यमातून सन २०२४ पर्यंत ५ हजार कोटींचा निधी उभारण्याचा संकल्प असल्याचे ते म्हणाले. कांदळवनाच्या जतन आणि संवर्धनात महाराष्ट्र आघाडीवर असून राज्यात १८ नवीन आणि सात प्रस्तावित संवर्धन राखीव वनक्षेत्रे घोषित केली आहेत. नागरी जैवविविधतेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.

पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ‘माझी वसुंधरा ३.०’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आमदार संजय गायकवाड, आमदार राजेंद्र राऊत, पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, स्वीत्झर्लंडचे उच्चायुक्त मार्टिन मेयर, आबासाहेब जऱ्हाड, विजय नाहटा यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी- अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, निरोगी आयुष्यासाठी पर्यावरण महत्वाचे आहे. विकास आणि पर्यावरण संवर्धन हातात हात घालून पुढे गेले पाहिजेत. देशात पर्यावरणीय दृष्ट्या महाराष्ट्र राज्याचे आगळे – वेगळे स्थान आहे. निसर्ग सौंदर्यानी नटलेले आपले राज्य असून हा अनमोल ठेवा आपल्याला जतन करावयाचा आहे. पर्यावरण रक्षणासाठी राज्य शासन कटिबध्द आहे. देशात पर्यावरणीय दृष्टीने राज्याचे महत्व आगळे – वेगळे असून निसर्गाचे वरदान आपल्याला लाभले आहे. पश्चिम घाट, समुद्रकिनारा, सह्याद्री पर्वतरांग हा आपला अनमोल ठेवा असून त्याचे जतन ही काळाची आणि समाजाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रकल्प पुढे नेताना पर्यावरणाचा ऱ्हास न होता शाश्वत विकास महत्त्वाचा असून आर्थिक विकास करताना निसर्गाचे संवर्धन व समतोल राखून प्रकल्प आपण करतो आहोत. पर्यावरण पूरक विकास हा राज्याच्या अर्थसंकल्पाचा अविभाज्य अंग आपण मानले आहे. राज्यात सौरऊर्जा, जल, पवन ऊर्जा या क्षेत्रात सरकारने तीस हजार कोटीचे सामंजस्य करार केले आहेत. ग्रीन हायड्रोजन, ग्रीन अमोनिया तसेच पवन ऊर्जा क्षेत्रात ७५ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, माझी वसुंधरा 3.0 च्या माध्यमातून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. त्यांच्या या सकारात्मक कामगिरीमुळे आज १७४ कोटी रुपयांचे बक्षीस या स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी या स्थानिक स्वराज्य संस्था, अधिकारी यांचा पुढाकार निश्चितपणे महत्वपूर्ण आहे. पंचमहाभूतांच्या संवर्धनात मोलाची कामगिरी करून माझी वसुंधरा अभियान 3.0 आपण राबविले. या अभियानाच्या माध्यमातून दोन कोटी वृक्ष लागवड करण्यात आली, ही कौतुकास्पद बाब आहे. १६ हजार ७१४ नवीन हरित क्षेत्र राज्यात तयार केली आहेत.

जागतिक स्तरावर वातावरणीय बदलाची चर्चा सुरू आहे दावोस मध्ये झालेल्या जागतिक गुंतवणूक परिषदेवेळीही हाच चर्चेचा विषय होता. तापमान वाढ, समुद्राच्या पाणी पातळीत वाढ, जैव प्रजाती नष्ट होण्याच्या घटनेत वाढ, अन्न सुरक्षा आणि आरोग्याबाबतच्या समस्या असे धोके निर्माण होत आहेत. यामुळे पर्यावरण रक्षणाबाबत सजग आणि संवेदनशील होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

आजच्या पर्यावरण दिनानिमित्त ‘सोल्यूशन टू प्लास्टिक पोल्यूशन’ अशी संकल्पना घेऊन आपण काम करत आहोत. पंतप्रधान मोदी यांनी लाईफ स्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ही संकल्पना मांडली आहे. पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून पर्यावरण पूरक समृद्धी महामार्ग आपण तयार केला आहे. या महामार्गाच्या दुतर्फा ३३ लाख झाडे आपण लावणार आहोत, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

या कार्यक्रमावेळी ‘माझी वसुंधरा 4.0’ च्या लोगोचे अनावरण, नोंदणीसाठी पोर्टलचे अनावरण, युनिसेफच्या पुस्तिकेचे प्रकाशन, विज्ञानधारा मासिकाचे प्रकाशन, मुख्यमंत्री शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर, महसूल मंत्री विखे पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी सेंटर फॉर वॉटर सॅनिटेशन यासह विविध सामंजस्य करार करण्यात आले.

माझी वसुंधरा 3.0 पुरस्कारांचे वितरण

यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते विविध संस्थांना पुरस्कार देण्यात आले. यामध्ये राज्यस्तरावरील पुरस्कारांमध्ये अमृत शहरे (१० लाखावरील लोकसंख्या) गटात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रथम, नवी मुंबई महानगरपालिका द्वितीय आणि पुणे महानगरपालिकेने तृतीय पुरस्कार पटकावला.

अमृत शहरे (३-१० लाख लोकसंख्या) गटात मीरा भाईंदर मनपा, अहमदनगर मनपा आणि पनवेल मनपाने अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.

अमृत शहरे (१-३ लाख लोकसंख्या) गटात सातारा नगरपालिका, बार्शी नगरपालिका आणि भुसावळ नगरपालिकेने अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.

नगरपरिषद आणि नगरपंचायत (५० हजार ते १ लाख लोकसंख्या) गटात कराड नगरपरिषद, लोणावळा नगरपरिषद आणि बारामती नगरपरिषदेने अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळवले.

नगरपरिषद आणि नगरपंचायत (२५ हजार ते ५० हजार लोकसंख्या) गटात गडहिंग्लज, मोहोळ आणि शिर्डी नगरपरिषदेने अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.

नगरपरिषद आणि नगरपंचायत ( १५ हजार ते २५ हजार लोकसंख्या) गटात दहिवडी, मालेगाव आणि निफाड नगर पंचायतीनी अनुक्रमे प्रथम तीन पुरस्कार पटकावले.

नगरपरिषद आणि नगरपंचायत ( १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या) गटात पाचगणी, पन्हाळा आणि महाबळेश्वर नगरपरिषद यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळवले.

ग्रामपंचायत ( १० हजार पेक्षा जास्त लोकसंख्या) गटात मंद्रूप (सोलापूर), गुंजाळवाडी ग्रा. पं. ( अहमदनगर) आणि विंचुर ग्रा.पं. (नाशिक) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.

ग्रामपंचायत ( ५ ते १० हजार लोकसंख्या) गटात बोराडी (धुळे), धरणगुट्टी (कोल्हापूर) आणि शिंदे (नाशिक) या ग्रामपंचायतींनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.

ग्रामपंचायत ( २.५ ते ५ हजार लोकसंख्या) गटात वाघोली (अहमदनगर), जवळगाव (नांदेड) आणि घाटनांद्रे (सांगली) या ग्रामपंचायतींनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले.

ग्रामपंचायत ( २.५ हजार लोकसंख्या पेक्षा कमी) गटात शिरसाठे (नाशिक), सिंदखेड (बुलढाणा) आणि मन्याची वाडी (सातारा) या ग्रामपंचायतींनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले.

भूमी थीमॅटिक क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या शहरांना यावेळी गौरविण्यात आले. यामध्ये विविध गटात पिंपरी चिंचवड महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका, सातारा नगरपरिषद, लोणावळा नगरपरिषद, गडहिंग्लज नगरपरिषद, दहिवडी नगरपंचायत, पांचगणी नगरपरिषद, सोनई ग्रामपंचायत, बोराडी ग्रामपंचायत, वाघोली ग्रामपंचायत, शिरसाठे ग्रामपंचायत यांना गौरविण्यात आले.

यावेळी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. विभागीय आयुक्त गटात सौरभ राव (पुणे), राधाकृष्ण गमे (नाशिक) आणि श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी (नागपूर विभाग) यांना अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाने गौरविण्यात आले.

सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी गटात डॉ. राजेश देशमुख (पुणे), रूचेश जयवंशी (सातारा) आणि राहुल रेखावार (कोल्हापूर) यांना अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाने गौरविण्यात आले.

सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गटात जितेंद्र डूडी (सांगली), आशिष येरेकर (अहमदनगर) आणि आशिमा मित्तल (नाशिक) यांना अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाने गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान सचिव दराडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भुस्कुटे यांनी केले.

Check Also

पाणथळ जागांसोबतच कांदळवनांच्या संरक्षणासाठी प्रभावी कारवाई मुख्यमंत्र्यांनी घेतली महाराष्ट्र पाणथळ प्राधिकरणाची बैठक

राज्यातील पाणथळ जागांसोबतच कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *