Breaking News

“बुरा ना मानो होली है”, श्रीरामांनी वस्ताला केला प्रश्न, माझ्यामुळे तु की तुझ्यामुळे मी

एक आटपाट नगरी होती. सुदैवाने म्हणा किंवा योगायोग म्हणा श्रीरामाचा धाकटा भाऊ भरत यांच्या नावासारखे त्या आटपाट नगरीचे होते. त्या नगरीत दर पाच वर्षांनी नवा गण प्रमुख निवडला जात असे. अद्याप त्या नगरीतील नव्या गण प्रमुख निवडीला काही कालावधी होता. परंतु विद्यमान गण प्रमुखाला काही केल्या मागील १० वर्षापासून हाती घेतलेले गणप्रमुखाचे पद काही सोडवेना. ते पद आपल्याच हाती रहावे यासाठी त्याने नाना खटपटी चालविल्या होता.

त्या आटपाट नगरीत या गणप्रमुखाने आपली दहशत निर्माण व्हावी यासाठी काही निवडक लोकांना अर्थात गुप्तहेर आणि चिडी यंत्रणांना हाताशी धरून व्यापारी वर्गात आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी गटात चांगलीच घाबरगुंडी उडवून दिली होती. तर दुसऱ्याबाजूला त्या आटपाट नगरीत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या पूर्वी सहजरित्या जीवनाश्यक गोष्टी उपलब्ध होत असत त्या गोष्टीच त्यांच्या आवाक्याच्या बाहेर नेऊन ठेवल्या. बर या सगळ्या गोष्टींवरून आणि गणप्रमुखाच्या कारभारावरून जनतेचे लक्ष्य जाऊ नये यासाठी या गणप्रमुखाने चक्क रामायणातील श्रीलंकेतील रावणाप्रमाणे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाला आणण्याची घोषणा केली.

तर दुसऱ्याबाजूला आटपाटी नगरीतील अनेक रामभक्त असलेली मंडळी सतत विद्यमान गणप्रमुखाच्या विरोधात श्रीरामाकडे आपली गाऱ्हाणी घालत. शेवटी गणप्रमुखाकडून करण्यात येत असलेल्या कामाची आणि रामभक्तांकडून घालण्यात येत असलेल्या गाऱ्हाणींची शाहनिशा करण्यासाठी आटपाट नगरीत जायचा निर्णय घेतला.

मात्र या गणप्रमुखाने आगामी गणप्रमुख निवडीत आपल्याकडेच या पदाची जबादारी रहावी यासाठी म्हणून सातत्याने श्रीरामाच्या नावाचा जपनाम सुरु केला. श्रीरामासाठी अब्जावधी रूपयांचा महालही गणप्रमुखांच्या समर्थकांनी उभा केला. त्या महालाला पाहुण गणप्रमुख जाम खुष झाला आणि त्याने घोषणा केली की श्रीरामांना या महालात आणून बसविणार. मागील अनेक वर्षापासून श्रीराम हे जंगलात, वनात, काट्याकुट्यात आणि ऊन, वारा, पाऊसात तर कधी कष्टकरी तर कधी अपंग, अंध व्यक्तींच्या रूपात येऊन जन्म घेऊन जगत आहेत. त्यांच्या निवाऱ्याची योग्य ती सोय झाली पाहिजे असे सांगत श्रीरामासाठी महालच योग्य असल्याचे जाहिर केले.

त्यानुसार श्रीरामांना महालात आसनस्थ करण्याची वेळ आली. परंतु गणप्रमुखाने सर्वांना अट घातली की, श्रीरामांना आसरा मी देतोय तर प्राप्त परिस्थितीत श्रीरामांना मी आणि माझे खास सेवकच त्यांचे सर्वात आधी स्वागत करतील आणि त्यानंतर आटपाटनगरीतील सर्वजण श्रीरामाची ख्याली खुशाली विचारण्यासाठी जातील. आता गणप्रमुखाचाच तो आदेश त्या आदेशाबर हुकूमनामा निघाला. त्याबर कारवाई झाली. विजनवासात राहिलेल्या श्रीरामाला महालात आणून विराजमान केले आणि त्याची द्वावीही नगरीत पसरविण्यात आली.

हा सगळा सोपस्कार पडल्यानंतर श्रीरामाने गणप्रमुखाला आटपाट नगरीच्या कारभाराच्या अनुषंगाने काहीवेळ चर्चा केली आणि थेट मुद्यालाच हात घातला,
श्रीराम यांनी पहिलाच सवाल केला की, वस्ता मी गेली अनेक वर्षे रानावनात, झाडात, फुलात आणि पाण्यात आणि इथल्या सर्व जीवमात्रात असताना माझ्या काही कालावधीसाठी हा इतका मोठा महाल उभा करण्याचा खर्च कशासाठी

त्यावर गणप्रमुखाने फार सुंदर उत्तर दिले, देवा श्रीरामा मी ज्या आटपाट नगरीचा गणप्रमुख आहे त्या नगरीत फक्त तुमचे सगळे भक्त आहेत. मी त्या भक्तांमधलाच (सोयीप्रमाणे) एक जण आहे. मी गणातील जनतेला शब्द दिला होता की, आपले श्रीराम आता आपल्यासोबतच राहतील, त्यामुळे मला तुमच्या निवासासाठी कोणतीही जागा प्रशस्त वाटत नव्हती. त्यामुळे मला त्या लल्लाची जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी नव्याने प्रासाद उभारावा लागला. इतकेच काय तुमचे आगमन होणार म्हणून आटपाट नगरीतील सगळ्यांना सुट्टी देऊन टाकली. इतकेच काय तुमचे स्वागत कसे केले जाते हे नगरीतील जनतेला घर बसल्या दिसावे यासाठी दूर नामक चित्रवाणी चालवणाऱ्यांना थेट प्रसारण करण्याचे आदेश देऊन टाकल्याचेही सांगितले.

गणप्रमुखाच्या या बोलण्याने श्रीराम काही काळ खुष झाले. त्यानंतर श्रीरामांनी रामभक्तांकडून घालण्यात येत असलेल्या गाऱ्हाणीचा अप्रत्यक्ष उल्लेख करत पुन्हा प्रश्न विचारला, अरे मी येत असताना माझ्या भक्त गणातील काही जण अजूनही उपाशी-अर्ध पोटी, मिळेल त्या आडोश्याला राहुन आपला जीवन चरिर्थात चालविताना पाहिले, इतकेच काय काही जणांना तर एकवेळच्या जेवणाची भ्रांत पडल्याचेही प्रवासा दरम्यान पाहिल्याचे सांगितले.

त्यावर पुन्हा गणप्रमुखाने त्याच्या स्वप्नातील जनतेबाबत करत असलेल्या कामाची महती सांगताना म्हणाला, देवा श्रीरामा आपण जसे सीतेला रावणाच्या तावडीतून आणण्यासाठी जात असताना शबरीची उष्टी बोरे खाल्लीत, तुमची किर्ती ऐकून जटायूने रावणाशी लढा दिला. याशिवाय सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमच्या मातोश्रींनी आपले बंधू भरत यांना गादीवर बसवता यावे यासाठी आपणास घरात राहण्यापेक्षा १४ वर्षाचा वनवास करण्यास भाग पाडले. त्यानुसार मी ही आटपाट नगरीतील लोकांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या सुसह्य जीवनासाठी मागील अनेक वर्षे रानावनात राहिलो, तपस्या केली, इतकेच काय हिमालयातील बर्फाळ प्रदेशातही राहुन आलो. आणि आता जनतेसाठी मी पुन्हा तुमच्याप्रमाणे गणप्रमुख झाल्याचे सांगितले.

त्यावर पुन्हा एकदा श्रीरामाने वस्त गणप्रमुखाला प्रश्न केला की, अरे मी तर माझ्या आई-वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी वनवासाला गेलो. पण तू तर वनवासाच्या नावाखाली आटपाट नगरीत असलेले सगळं ऐश्वर्य भोगतोयस असे कसे.

त्यावर गणप्रमुख म्हणाला की, देवा हे सगळं आटपाट नगरीच्या रितीरिवाजा प्रमाणे करतोय, पण आज मला लोकांनी सांगावं, मी माझी पूर्वीची झोळी घेऊन येथून निघून जाईन. त्यावर श्रीरामानेही मिश्किलपणे म्हणाले की, तु कुठे लोकांना पुन्हा एकदा सांगायची आणि विचारायची संधी देतोस, एक तर तू विचारायची वेळ आली की तू एक तर आटपाट नगरीच्या बाहेर फिरायला जातोस नाही तर हल्ली समुद्राच्या तळाशी जाऊन बसतोस. म्हणजे लोकांनी तूला विचारूच नये अशी जणू काही व्यवस्था करून ठेवलीस, बरं तुझी ती परवाची बातमी वाचली, त्यात तू तर आधीच ठरवून टाकलस की तूच गणप्रमुख पदावर बसणारायस आणि येत्या गणप्रमुखाच्या निवडी दरम्यान तुला प्रतिस्पर्धी नको म्हणून तु आता पासूनच सर्वांना तुरुंगात डांबायला सुरुवातही केलीस, श्रीरामाच्या या खोचक सवालावर गणप्रमुख थोडासा खजील होत पण तसे चेहऱ्यावर भाव न दाखवता श्रीराम देवालाच सवाल केला.

देवा श्रीरामा, मी कोणालाही नाही सांगत की त्याला तुरुंगात डांबा किंवा अमक्या तमक्यावर चोरीचा आळ आणा, जे तुरुंगात डांबले जात आहेत ते आधीच चोर आहेत, त्यांची चोरी राज्याच्या चिडी यंत्रणेने आधीच हेरली आहे. त्यामुळे यंत्रणा आपले काम चोख बजावत आहे. त्यात मी काहीही हस्तक्षेप करत नाही असे सांगत श्रीरामांना घडत असलेल्या घटनांच्या मागे स्वतःचा कोणताही हात नसल्याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत साळ सुदपणाचा आव आणला.

त्यावर श्रीराम म्हणाले, अरे वत्सा, आटपाट नगरातील जनतेसाठी तू काय काय केलेस हे सांगतोयस पण मी तुझ्या सांगण्यात आणि प्रत्यक्ष परिस्थितीत भलताच फरक असल्याचे आता जाणवायला लागले आहे. माझी रामभक्त मंडळी रोज मला तुझ्या कामातील उणीवा आणि काळेबेरेपणा आणि तुझ्यातला बेरकीपणा सतत माझ्या कानी घालत असतात. पण म्हणलं राम भक्तांची गाऱ्हाणीवर विश्वास ठेवण्यापेक्षा आटपाट नगरीच्या दौऱ्यावर जावं आणि आपणच पहाव की खरं काय ते. पण इथे यायला निघालो तर तुझ्या इलेक्टोरल की बिलेक्टोरलच्या घोटाळ्याची बातमी कानावर पडली, अन् मी जागेवरच उडालो. नाव जनतेचं आणि भलं मात्र तुझं असंच काही तरी तुझ्या कामातून आता दिसायला लागलं आहे. बरं तुझं लग्नबिग्न झालं की नाही किती मुलं बाळं ती काय करतात असा शेवटी प्रश्न श्रीरामाने वत्स गणप्रमुखाला केला.

त्यावर गणप्रमुख म्हणाला, देवा श्रीरामा, माझा आदर्श तर तुम्हीच आहात. त्यामुळेच मी माझ्या पत्नीला सोडले आणि जनतेच्या दुःखावर मार्ग काढण्यासाठी मी संसाराचा त्याग केला. गणप्रमुखाच्या या बोलण्याला मध्येच तोडत श्रीराम म्हणाले अरे वत्सा थांब, किती लांबची फेकतोयस रे, म्हणे माझा आदर्श आहे तुझ्यासमोर. अरे मी माझ्या पत्नीला फक्त माझ्या राज्यातील एकाच्या सांगण्यावरून फक्त अग्नी परिक्षा द्यायला लावली. पण तु तर तुझ्या आटपाट नगरीतील महिलांबरोबरच तुझ्या पत्नीलाही कारण नसताना रोज अग्नी परिक्षा जबरदस्तीने द्यायला लावतोस असा माझा संशय वाटायला लागला आहे. बरं ते तुझ्या आटपाट नगरातील शेती पिकविणाऱ्यांच्या प्रश्नावर निर्णय घ्यायला म्हणे तुझ्याकडे वेळ नाही. बरं त्यांनी तुझ्या आटपाट नगरीत येऊ नये म्हणून तु टोकदार तारा आणि रस्त्यावर खिळे आणि तुझी ते सीमेवर पाठवायचे सैन्य म्हणे तू त्यांना रोखण्यासाठी पाठवलंस म्हणे.

त्यावर वस्त गणप्रमुख म्हणाला, देवा श्रीरामा हेच मी तुम्हाला सांगणार होतोच पण बरं झालं तुम्हीच तो विषय काढलात. ते शेती पिकविणारे साले नेहमी असा त्रास नेहमीच देतात. मागील वेळीही त्यांनी असाच त्रास दिला होता. पण मी त्यांना पुरुन उरलो. ते त्यांना आटपाट नगराच्या फुटीरता वाद्यांशी त्यांचे संधान आहे. त्यामुळे ते नेहमी अशा गोष्टी करत असल्यानेच मी त्यांना नगरीत येऊ देत नाही असे सांगत आपल्यावर येणारा आरोप फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला.

परंतु देवा श्रीरामांनी वस्त गणप्रमुखाची बोलण्यातील चतुरपणा ओळखत म्हणाले, वस्ता तु तर भलताच फेकू आहेस रे, म्हणजे तुला पाहिजे तेव्हा तू त्याच्यांसमोर पोपटपंची करत वारेमाप आश्वासन देतोस आणि त्या आश्वासनाबर अंमलबजावणी करण्याची वेळ आली की ते फुटीरतावादी म्हणून त्यांना ठरवायचं, हे आलयं आता आमच्याही लक्षात. बरंय निघतो आता पुरा झाला तुझा महाली राजपाहुणचार थोडक्यात काय माझ्या रामभक्तांनी घातलेली गाऱ्हाणीच खरी होती म्हणायची. उगाच तुझ्या बोलण्याला भुललो, पण एक गोष्ट लक्षात ठेव मी जरी इथे प्रत्यक्ष नसलो तरी इथल्या प्रत्येक कणाकणात आहे आटपाट नगरीतही आहे आणि शेती पिकविणाऱ्याच्या मातीतही आहे याचा विसर तुला पडायला लागलाय. याचा अर्थ तुझी वेळ झालीय असे सांगत श्रीराम अंर्तधान पावले.

(टीपः- हा संपूर्ण संवाद हा काल्पनीक असून होळीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेला आहे. कृपया या लेखातून काही साम्यस्थळे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. या काल्पनिक संवादातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *