अजित पवार गटाच्या बड्या नेत्याची खुली ऑफर, या ईडी-सीबीआयची लफडी… वर्षभर तुरुंगात राहिलेल्या पक्षाच्या जुन्या ज्येष्ठ आमदारांना दिली ऑफर

राज्याच्या राजकारणातील एकमेव तुल्यबळ असलेले नेते शरद पवार यांच्यापासून त्यांचेच पुतणे आणि राज्याच्या राजकारणातील दादा माणूस असलेल्या अजित पवार यांच्यासह काही जणांनी राष्ट्रवादीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या फाटाफुटीनंतर पक्षचिन्ह कोणाचे आणि पक्ष कोणाचा खरा यावरून शरद पवार अजित पवार या काका पुतण्याचा वाद अखेर केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचला. त्यावर पक्षातील जुन्या जाणत्या नेत्यांची साथ आपल्यासोबतच आहे असे दाखविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते सध्या शरद पवार गटाच्या आमदारांना आपल्याबाजूने खेचण्याचे प्रयत्न सुरु केले असून त्या आमदारांच्या मागे ईडी-सीबीआयचे काही लफडं असेल तर ते मिटवून टाकू अशी खुली ऑफरही देण्याचे काम सुरु असल्याची विश्वासनीय माहिती नुकतीच हाती आली.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मंत्र्यांवर आणि शिवसेनेच्या अनेक व्यावसायिक असलेल्या आमदार- खासदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपाकडून करण्यात आले. त्यानंतर शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट असे दोन गट पडले. परिणामी राज्याच्या मुख्यमंत्री पदावर शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे विराजमान झाले.

तत्पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरही अशाच पध्दतीने भाजपाकडून आरोपाच्या फैरी झाडण्यात येत होत्या. तसेच सीबीआय आणि ईडी, आयकर विभागाकडून चौकशीच्या फेऱ्याही सुरु झाल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही भाजपासोबत जाण्याचा विचार प्रवाह सुरु झाला. त्यातूनच शरद पवार यांचे पुतणे अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेत राज्य सरकारमध्येही सहभागी झाले. त्यानंतर पक्षचिन्ह आणि पक्षावर अजित पवार गटाकडून दावा करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आमदारांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे.

त्यातच अजित पवार गटाकडून आपल्या समर्थकांची संख्या वाढविण्यासाठी तुरुंगवारी करून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ आमदारांना अजित पवार गटाकडून संपर्क साधण्यात आला. त्यावेळी अजित पवार गटाच्या नेत्याने थेट ऑफर देत आमच्यासोबत आल्यास तुमची ईडी-सीबीआयची चौकशी बंद करू असे सांगत अजित पवार गटाला समर्थन देण्याचा प्रस्ताव समोर ठेवला.

त्यानंतर तुरुंगवारी केलेल्या या ज्येष्ठ आमदाराने सांगितले की, जर मला भाजपासोबत जायचेच असते तर मी तुरुंगात वर्षभरासाठी कशाला गेलो असतो असा सवाल अजित पवार गटाच्या नेत्याला केला. तसेच भाजपासोबत जाण्याची कोणतीही इच्छा नसल्याचे सांगत माझ्या सारखे काही जण आहेत ते शेवटपर्यंत शरद पवार यांच्यासोबतच राहण्यात रस असल्याचेही सांगत केवळ ईडी-सीबीआयकडून मुक्ती मिळावी यासाठी भाजपासोबत जाणार नसल्याचेही या नेत्याने अजित पवार गटाच्या नेत्याला निक्षून सांगितल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, निवडणूक आयोगासमोर समर्थक आमदारांची संख्या जास्त दिसावी यासाठी अजित पवार गटाकडून खास भाजपाच्या पाठिंब्याने प्रयत्न करण्यात येत असून समर्थक आमदारांची संख्या कमी पडत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Check Also

इराणने ताब्यात घेतलेल्या जहाजावरील पहिला भारतीय क्रु मेंबर भारतात परतली

इराणी अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्याच्या शेवटी ताब्यात घेतलेल्या पोर्तुगाल ध्वजांकित MSC मेष या जहाजावरील सतरा भारतीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *