Breaking News

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, मंत्रीमंडळाला विश्वासात न घेता मराठा आरक्षण अधिसूचना

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची अधिसूचना काढण्यात आली. ही अधिसूचना काढण्याबाबतचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत झाला नाही. मंत्रीमंडळाला विश्वासात न घेता मराठा समाजाचा नेता म्हणून मिरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही मराठा आरक्षणाबाबतची अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेमुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला असून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येत्या २० फेब्रुवारीला संभाजीनगर येथे ओबीसींच्या विराट सभेचे आयोजन केले आहे. ही सभा ओबीसींच्या संविधानिक हक्काच्या रक्षणासाठी आहे. आरक्षण देण्यावरून सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असून या लढाईमुळे ओबीसी समाजाला उद्ध्वस्त करण्याचे पाप सरकारकडून केले जात आहे. असा हल्लाबोल करत आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोधी नाही, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

मुंबई येथे आज ओबीसी समाजाच्या संघटनांची बैठक विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार बोलत होते.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, गृहमंत्री म्हणताता भाजप आहे तोपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. केंद्रीय मंत्री राणे म्हणतात स्वाभिमानी मराठा समाज कुणबी समाजामध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही. मुख्यमंत्री म्हणतात की, आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील. गृहमंत्री म्हणतात सरसकट गुन्हे मागे घेता येणार नाहीत. यावरून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमधील विसंवाद दिसून येतो. हे सरकारच ओबीसी विरूद्ध मराठा हा वाद निर्माण करून दोन्ही समाजामध्ये संशयाचे वातावरण निर्माण करत आहे.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, सगेसोयरे शब्दामुळे ओबीसी आरक्षणात कोणाचाही शिरकाव होऊ शकतो. त्यामुळे ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण देण्यास आमची हरकत नाही. सध्याच्या अधिसूचनेत अटी शिथिल केल्यामुळे प्रमाणपत्र कोणालाही मिळू शकते हे चुकीचे आहे. सरकार एकाच समाजाचे हित पाहत आहे. सरकारची ही अडेलतट्टूपणाची भूमीका ओबीसी समाजाला खड्ड्यात घालणारी आहे. ओबीसी समाजातील बांधवांनी १६ फेब्रुवारीपर्यंत अधिसूनेवर आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, संभाजीनगर येथे २० फेब्रुवारीला ओबीसींची विराट सभा होणार आहे. या सभेपूर्वी येत्या ५ तारखेपासून राज्यातील आमच्या शक्तीस्थळाना भेट देवून आम्ही स्फूर्ती घेणार आहोत. याची सुरूवात चैत्यभूमीपासून होणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेला समर्थन असल्याचेहीयावेळी स्पष्ट केले. त्याचबरोवर सध्या महाराष्ट्रात आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सर्व्हेंवर विरोधी पक्षनेत्यांनी आक्षेप नोंदविला.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *