Breaking News

शरद पवार यांचा निर्धार, लोकशाहीच्या मार्गाला, शांततेला धक्का देणाऱ्या प्रवृत्तींना बाजूला करू जाती-धर्मात, माणसा-माणसांत संघर्ष कसा होईल याची काळजी घेणारा एक वर्ग

महाराष्ट्रात उलथापालथ करण्याची भूमिका ज्याप्रवृत्तींनी घेतली त्यात दुर्दैवाने आपले सहकारी बळी पडले. जे घडले त्यानंतर फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रातील सामान्य माणूस एक वेळ उपाशी राहील पण राज्याची सामूहिक शक्ती मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. या माध्यमातून उलथापालथ करणारा जो वर्ग आहे त्यांना त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असे ठणकावून सांगतानाच वर्षभराने पुन्हा लोकांसमोर जायची संधी येईल, त्यावेळी राज्यातील लोकशाहीच्या मार्गाला, शांततेवर विश्वास असणाऱ्या शक्तींना धक्का देणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्यांना पूर्णपणे बाजूला करूया आणि पुन्हा एकदा प्रगतीशील आणि सामान्य माणसाच्या हितासाठी कष्ट करणाऱ्यांचे महाराष्ट्र राज्य निर्माण करूया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कराड येथे पत्रकांराशी बोलताना केले.

आज सकाळी शरद पवार यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळ असलेल्या प्रीतिसंगमावर येऊन अभिवादन केले.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, आज महाराष्ट्रात आणि देशात जाती-धर्मात, माणसा-माणसांत संघर्ष कसा होईल याची काळजी घेणारा एक वर्ग आहे. महाराष्ट्र हा बंधुत्व, इमान राखणाऱ्यांचा सन्मान करणारे राज्य आहे. पण मध्यंतरीच्या कालखंडात याच महाराष्ट्रात कोल्हापूर, संगमनेर, अकोला अशा काही ठिकाणी पिढ्यानपिढ्या एकत्र राहणाऱ्या समाजात एक प्रकारची वैरभावना वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. यातून जातीय दंगे झाले जे महाराष्ट्राला शोभणारे नाहीत अशी नाराजीही व्यक्त केली.

पुढे बोलताना शरद पवार यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारमार्फत राज्याची सेवा होत असताना ते सरकार या ना त्या पद्धतीने उलथून टाकण्याचे काम काही लोकांनी केले. केवळ महाराष्ट्रात नाही तर देशात इतर ठिकाणीही असे करण्यात आले. चुकीच्या प्रवृत्ती डोकं वर काढत आहेत. त्याच प्रवृत्तींनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चव्हाणसाहेब यांच्या महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने काम करणाऱ्या राजकीय पक्षाला एक प्रकारचा धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व जातीय आणि तत्सम विचारधारा आहेत, यातून देशाचा कारभार पुढे नेण्याचा प्रयत्न होतोय असेही म्हणाले.

शरद पवार म्हणाले, आज गुरुपौर्णिमा आहे. त्यामुळे आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात जनमानस तयार करण्यासंबंधीचा निर्णय काल आम्ही घेतला. याची सुरुवात करायची असेल तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या समाधीशिवाय दुसरे स्थळ नाही. तुमचे, माझे, सगळ्यांचे गुरु, या पदावर जाऊन मार्गदर्शन करण्याचा अधिकार एकाच व्यक्तीला होता ती व्यक्ती म्हणजे यशवंतराव चव्हाणसाहेब. त्यांच्या स्मृतिस्थळी याठिकाणी आपण प्रचंड संख्येने आलो त्याबद्दल सर्वांना धन्यवाद.

Check Also

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *