Breaking News

लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी घेतला हा निर्णय शरद पवार आपल्यासोबत, फोनवरून बोलणे झाले

आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. या तयारीचा भाग म्हणून लोकसभानिहाय मतदारसंघांचा आढावाही घेण्यात येत आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत भूमिका स्पष्ट करताना आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आपण इंडिया आघाडीसोबत असल्यानं सुप्रिया सुळे यांना बळ द्या, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा उद्धव ठाकरे यांनी आज घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघाची स्थिती संदर्भात उद्धव ठाकरेंनी स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांकडून आढावा बैठकीत माहिती घेतली. आपण इंडिया आघाडीमध्ये असल्यामुळे बारामतीत सुप्रिया सुळे यांना आपल्या पक्षाकडून ताकद द्या, त्यांना साथ द्या, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी नेत्यांना केल्या आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाची ताकद किती आहे यासंदर्भात विधानसभा निहाय सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला.

उद्धव ठाकरे यांनी या लोकसभा मतदारसंघात आपण कोणत्या विधानसभा जागांसाठी विचार करू शकतो या संदर्भात नेत्यांना विचारणा केली. खडकवासला विधानसभा मतदारसंघाची जागा ठाकरे गटाला मिळावी अशी इच्छा स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आजच्या बैठकीत व्यक्त केली आहे. या लोकसभा मतदारसंघात आपण इतर विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ताकद देणार असू तर खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठी आपण प्रयत्न करायला हवा असं म्हणणं नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे समोर मांडलं आहे.

उद्धव ठाकरेंच्या लोकसभा मतदार संघ निहाय आढावा बैठकांचा पहिल्या टप्प्यातील शेवटचा दिवस उद्या आहे. उद्या कोल्हापूर, सांगली, सातारा, हातकणंगले या चार लोकसभा मतदारसंघाचा आढावा उद्धव ठाकरे घेणार आहेत. या चार मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघात सेनेचे उमेदवार विजयी झाले होते. साताऱ्याची जागा शिवसेनेकडे होती. ती उद्धव ठाकरे यांनी २०१९ च्या पोटनिवडणुकीत भाजपसाठी सोडली होती. धैर्यशील माने आणि संजय मंडलिक हे दोन्ही खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानं ठाकरे आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीच्या संदर्भात बोलताना उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले, शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा झाली आहे. ते आपल्यासोबत आहेत. फक्त अजित पवार यांचा गट भाजपासोबत गेला असल्याचेही शिवसैनिकांना सांगितले.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *