Breaking News

वंचितची दुसरी यादी जाहिर, या ११ मतदारसंघातून उभे केले उमेदवार

राज्यातील महाविकास आघाडीबरोबरील जागा वाटपाच्या चर्चेत वंचित बहुजन आघाडीबरोबर योग्य तो तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने कोल्हापूर आणि नागपूर येथील लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. तसेच पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात आठ उमेदवारांची यादी जाहिर केली होती. त्यानंतर आज दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीने दुसरी यादी जाहिर केली.

या दुसऱ्या टप्प्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईतील जागांवर उमेदवार जाहिर केले आहे. या तीन भागात जवळपास ११ उमेदवारांची यादी वंचित बहुजन आघाडीने जाहिर केली आहे. विशेष म्हणजे जाहिर केलेले मतदारसंघ हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उबाठा पक्षासाठी सकारात्मक असलेल्या ठिकाणीच वंचितने उमेदवारी जाहिर केली आहे.

वंचितने जाहिर केलेली उमेदवारी हिंगोली, लातूर, सोलापूर, माढा, सातारा, धुळे, हातकणगंले, रावेर, जालना, मुंबई उत्तर मध्य आणि रत्नागिरी-सिंधूदुर्ग या ठिकाणी वंचितने उमेदवार जाहिर केले आहेत. यापैकी लातूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे. मात्र आता तेथे भाजपाचे खासदार सुधाकर शृंगारे हे आहेत. तर सोलापूर हा सुशिलकुमार शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या मतदारसंघातून सुशिल कुमार शिंदे यांच्या विरोधात वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी दोन वेळा निवडणूक लढविली. मात्र या दोन्ही निवडणूकीत सुशिल कुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्याऐवजी भाजपाचा उमेदवार विजयी झाला.

माढा मतदारसंघ हा सध्या भाजपाचे हिंदूराव निंबाळकर हे खासदार आहेत. मात्र आता त्यांच्या उमेदवारीला भाजपामधूनच मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. या ठिकाणीही वंचित बहुजन आघाडीने उमेदवार उभा केला आहे. तर सातार लोकसभा मतदारसंघ हा शरद पवार यांची मजबूत पकड असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. तसेच शरद पवार यांचे मित्र असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी यावेळी लोकसभा निवडणूकीत माघार घेतली आहे. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसमधील एखादा मोठा नेता लोकसभेसाठी उभा करण्याची रणनीती आखली जात आहे. येथेही वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार दिला आहे.

रावेर लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे या आहेत. मात्र त्या भाजपामध्ये आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणूकीत रक्षा खडसे यांनाही निवडणूकीत पराभूत करण्यासाठी भाजपामधून पराभूत करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर वंचितने येथेही उमेदवार दिला आहे.

तर आता बदललेल्या राजकिय गणितामध्ये हातकणगंले, धुळे, जालना, आणि मुंबई उत्तर मध्य हे लोकसभा मतदारसंघ पुन्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात येम्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याशिवाय यातील काही मतदारसंघात शिवसेना उबाठा गटाचा प्रभावही वाढत आहे. तसेच रत्नागिरी-सिंधूदुर्गमध्ये शिवसेना उबाठा गटाचे विनायक राऊत हे विद्यमान खासदार आहे. सध्याच्या परिस्थितीत शिवसेना उबाठा गटाला ही जागा पुन्हा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर भाजपाकडून विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने येथे आपला उमेदवार जाहिर केला आहे.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *