Breaking News

नोटीस मिळाल्यावर ठाकरे गटाचे देशमुख म्हणाले, मी चौथ्या नोटीसीची वाट बघतोय… यात मुख्यमंत्र्यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप

गुजरातमधल्या सूरतहूनच शिंदे गटातून माघार घेतलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) अमरावती कार्यालयातून नोटीस पाठविण्यात आली. अवैध मालमत्तेची चौकशी करण्यासाठी १७ जानेवारी रोजी त्यांना अमरावतीच्या कार्यालयात बोलविण्यात आले आहे. एसीबीची नोटीस मिळाल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख म्हणाले, मला आतापर्यंत तीन नोटीसा मिळाल्या असून आता चौथ्या ईडीच्या नोटीसीची मी वाट बघत असल्याचा उपरोधिक टोला शिंदे गटाला लगावत मला मिळालेल्या अनधिकृत माहितीवरून या नोटीसीमागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असल्याचा गंभीर आरोप करत पण यात सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याचे नाव मला अधिकृतरित्या मिळाल्यानंतर याबाबत मी स्पष्टपणे बोलेन असे सांगितले.

यावेळी नितीन देशमुख पुढे बोलताना म्हणाले, मालमत्तेबाबत १७ जानेवारी रोजी जबाब नोंदविण्याचे आदेश नोटिशीत देण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी खासदार भावना गवळी यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला होता. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कलम ३५३ नुसार माझ्यावर गुन्हा दाखल झाला. आता अमरावती येथून एसीबी कार्यालयाची नोटीस आली आहे. माझे म्हणणे मी त्यावेळी मांडणार असल्याचेही सांगितले.

आमच्याकडे मालमत्ता किती आहे याची माहिती त्यांनी विचारली आहे. जेव्हा निवडणूका येतात त्यावेळी आमची मालमत्ता किती आहे याची माहिती निवडणूक आयोगाबरोबर सगळ्यांकडे जगजाहीर होते. त्यामुळे पुन्हा मालमत्तेच्या नावाखाली आमची चौकशी होत असेल तर त्यांनी खुशाल करावी असेही ते म्हणाले.

यावेळी नितीन देशमुख म्हणाले की, तक्रार कुणाची आहे, तक्रारदाराचं नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे? याबाबत कोणतेही स्पष्टीकरण नोटीशीत दिलेलं नाही. आमदाराला नोटीस देताना तक्रारदाराचं साधं नाव देखील दिलेले नाही. १७ तारखेला अमरावती येथे पत्रकार परिषद घेऊन मीडियाला याबाबत माझी भूमिका स्पष्ट करेल. भास्कर जाधव अधिवेशनात बोलले, लगेच त्यांना नोटीस आली. मलाही आता नोटीस आली आहे. ईडीची नोटीस आली तरी मी घाबरणार नाही. माझ्याकडे चुकीची मालमत्ता नाही.

आपल्याला एसीबीच्या कार्यालयातून एक फोन आला होता. तुमची एसीबी कार्यालयात तक्रार प्राप्त झालेली आहे. त्यामुळे एकदा वर जाऊन संपर्क साधावा. आता वर जाऊन म्हणजे नेमकं कुणाला भेटावं, हे मला आणि सर्वांनाच कळलेलं आहे. तरीही मी काही संपर्क करणार नाही. मी माझ्या पक्षाशी प्रामाणिक आहे आणि राहणार, अशी प्रतिक्रिया नितीन देशमुख यांनी दिली.
नितीन देशमुख हे अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार आहेत.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *