दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेली अटकेची कारवाई चुकीची आहे. लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम सुरु असल्याचं यातून स्पष्ट दिसून येत आहे. आम्ही मोठ्या ताकदीने अरविंद केजरीवाल यांच्या पाठिशी उभे राहू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी दिल याची किंमत भाजपाला आणि केंद्र सरकारला मोजावी लागेल, असा इशाराही यावेळी भाजपाला दिला.
दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आप पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना दोन तासाच्या चौकशीनंतर अटक केली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपावर हल्लाबोल केला.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, निवडणुकीच्या काळामध्ये भाजपाकडून भीती पसरवण्याचे काम सुरू आहे. आधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली. त्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांना अटक केली, उद्या कोणाला अटक करतील माहिती नाही असे म्हणत भाजपावर टीकास्त्र सोडले.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, भाजपाकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. राज्याच्या काही प्रमुख नेत्यावर ईडीचा वापर करून त्यांच्यावर कारवाई केली जाते. ज्या राज्यात ज्या नेत्यांचा प्रभाव आहे, त्यांना तुरूगांत टाकण्याचं काम केलं जात आहे. अरविंद केजरीवाल यांना केलेली अटक चुकीची आहे. याआधी राज्यातील काही महत्त्वाच्या नेत्यांना अटक केली. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली, राज्यात धोरण ठरवणाऱ्या राज्याच्या प्रमुखाला अटक करणं ही चुकीची गोष्ट आहे, ही चितेंची बाब आहे अशी टिकाही यावेळी केली.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, ईडी, सीबीआयचा वापर करणे निवडणुकीच्या काळात दहशतीचं वातावरण निर्माण करणं या सर्व गोष्टींचा मी निषेध करतो, आणीबाणीच्या काळात जे झालं नाही ते आता होत आहे, केजरीवालांच्या अटकेची किंमत भाजपाला मोजावी लागणार आहे. केजरीवाल हे दिल्लीत बसून मोदींच्या भूमिकेला विरोध करतात. त्यामुळेच त्यांच्याविरोधात ही अटकेची कारवाई करण्यात आल्याचेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, आतापर्यंत देशात काही अपवाद सोडले तर निवडणुका या अतिशय मोकळ्या वातावरणात झाल्या आहेत. मात्र यावेळेची निवडणूक कशी होईल याची शंका आहे. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सध्या सुरु आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसची बँक खाती गोठवल्याने त्यांची प्रचार यंत्रणा थांबली असल्याचेही यावेळी सांगितले.
यावर सविस्तर बोलताना शरद पवार म्हणाले की, मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर भाजपाने कारवाई करत मोठे संकट स्वतःवर ओढावून घेतले आहे. यामुळे केजरीवाल यांनाच मोठे मताधिक्य मिळणार आहे. मागच्या वेळी विधानसभेत भाजपाला ७० पैकी तीन जागांवर विजय मिळवता आला होता, पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये तितक्याही जागा त्यांना मिळणार नाहीत. पण केजरीवाल यांच्या नेतृत्वात १०० टक्के जागा निवडून येतील असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.
माढा मतदारसंघाची जागा महादेव जानकर यांनी लढवावी
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, माढ्याची जागा महादेव जानकर यांनी लढावी, ही माझी वैयक्तीक मागणी आहे. मात्र सगळ्यांनी ऐकली पाहिजे. ज्योती मेटे यांच्यासंदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही. आमच्याकडे आणखी लोक येतील, महायुतीची जागा निश्चित झाल्यावर आणखी माणसं येतील. राज ठाकरे यांचा पक्ष एक ते दोन जागा लढवणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यामुळे काही फरक पडणार नाही असेही स्पष्ट केले.