केंद्रात सत्तेत असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या वतीने केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून विरोधी पक्षाने स्थापन केलेल्या इंडिया आघाडीतील पक्षातील नेत्यांविरोधात विविध तपास यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी केली आहे. आपल्या विरोधात दुसरा पर्याय उभा राहू नये याकरिता सत्तेचा गैरवापर करण्यात येत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर आज केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार व प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज प्रदेश कार्यालय, मुंबई येथे चिपळूण विधानसभा मतदारसंघातील सहकार क्षेत्रातील प्रशांत यादव व भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग पाष्टे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला आहे.
पक्षप्रवेशावेळी मार्गदर्शन करताना अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, देशात सध्या सत्तेत असलेल्या पक्षाकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. केंद्रातील यंत्रणेच्या माध्यमातून पक्ष फोडाफोडीचे काम देखील करण्यात येत आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती. मात्र सत्तेचा गैरवापर करून शिवसेना सत्तेत असलेल्या सोबत आलेल्या व्यक्तींकडे देण्यात आली आहे तसंच काहीसं आपल्या सोबत देखील झाले आहे.
शरद पवार बोलताना म्हणाले की, आगामी काळात लोकसभा आणि त्या नंतर ४ महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहे. यामध्ये महत्त्वाचे आहे की पक्ष मजबूत केला पाहिजे संघटना मजबूत केली पाहिजे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज पक्ष प्रवेश झाला तरी राज्यात त्यांच्या नेतृत्वात सगळ्यांनी काम केले पाहिजे. जर जोमाने काम केले तर आपण आगामी काळातील, महाराष्ट्राचे चित्र बदलू शकतो असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नेहमीच कोकण वासियांनी प्रेम केले आहे. आज आपल्या सर्वांच्या समक्ष चिपळूण विधानसभा मतदारसंघातील प्रशांत यादव यांनी आपल्या पक्षात काम करायचे ठरवले आहे. आज सगळ्या परिस्थितीत विचार करताना राज्याचे राजकारण आपण अनुभवले आहे. जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली तेव्हा कोकण वासियांना विविध योजनेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोकणाच्या विकासासाठी अनेक विशेष सवलती दिल्या आहेत. शरद पवार केंद्रात कृषी मंत्री असताना आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना मोठ्या प्रमाणात कोकणाचा विकास केल्याचे सांगितले.
जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवला आहे. कोकणवासीयांनी नेहमीच शरद पवारांवर विश्वास ठेवला आहे. केंद्रात कृषी मंत्री असताना सुपारी बाग पासून नारळ आणि आंबा बागायतदारांना वेगवेगळे निर्णय घेतले होते. शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयामुळे कोकणामधील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला होता. आज ज्या प्रमाणात राज्यात कोकणचा विकास झाला आहे. कोकणावर जेव्हा ही संकट आलं त्यावेळी सर्वात पहिले शरद पवार धावून जात होते आजही कोकणावर कोणतेही संकट आले तर सर्वात पहिले शरद पवार आजही या वयात धावून जाण्याचे काम अविरतपणाने सुरु ठेवलेलं आहे. पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आज नाहीतर गेले ४० ते ५० वर्षे महाराष्ट्राचे नेतृत्व केलं कोकणवासीयांना नेहमी प्राधान्य देण्याचं काम शरद पवारांनी केलं. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ स्थापन करताना देखील कोकणाचा वाटा कोकणाला दिला पाहिजे ही भूमिका कधी विसरले नाही. शरद पवार साहेबांनंतर कोकणातील या भागात एवढे मोठे निर्णय आज पर्यंत कोणी घेतलेले नाही आहे असा दावाही यावेळी केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस व प्रवक्ते नसीम सिद्दीकी, माजी मंत्री व आमदार राजेश टोपे, विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, प्रदेश सरचिटणीस व निरीक्षक बबन कनावजे, प्रदेश सरचिटणीस प्रभाकर चाळके, प्रदेश सरचिटणीस अदितीताई नलावडे, प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेटे, प्रदेश चिटणीस बशीर मुर्तजा, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश बने, रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश शिगवण, रत्नागिरी संपर्क प्रमुख प्रशांत पाटील, रत्नागिरी महिला जिल्हा अध्यक्षा दिपीकाताई कोतवडेकर व डॉ. नलिनीताई भुवड यांसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.