Breaking News

शरद पवार यांचा आरोप, व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम सुरुय…

सध्या कोल्हापूर आणि पुणे दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार याच्या गटाचे प्रमुख शरद पवार यांनी सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलन आणि प्रसारमाध्यमात दाखविण्यात येणाऱ्या बातम्यांच्या प्रश्नीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर खोचक टीका केली.

कोल्हापूर येथे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्या निमित्त आयोजित कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी शरद पवार बोलताना म्हणाले की, हल्लीचे सरकार दर १५ दिवसाला आपले निर्णय बदलते. कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय हा त्याचाच भाग आहे. तर विशेषतः शेती क्षेत्राविषयी सततच्या धरसोडणा शेती अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक असल्याची टीका करत शरद पवार म्हणाले की, सध्या सत्तेत असलेल्या सरकारची भूमिका शेतकऱ्यांना न्याय देण्याची असल्याचे दिसत नाही. त्यामुळे पंजाब आणि हरियाणातील शेतकरी अस्वस्थ आहेत. त्याचबरोबर एखाद्या प्रसारमाध्यमाने काही बातम्या दाखविल्या तर एक महिना त्या प्रसारमाध्यमाचे चॅनलच बंद ठेवले. त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम सरकारकडून करण्यात येत असल्याची टीकाही केली.

तसेच मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करताना शरद पवार म्हणाले की, जातनिहाय जणगणना करण्याची आम्हा सर्वांची मागणी आहे. तसेच राज्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना अशाच पध्दतीने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. पण ते पुढे न्यायालयात टिकले नाही. पुन्हा तशाच पध्दतीने आरक्षण मंजूर करून घेतले आहे. कायदे तज्ञ बापट यांच्या मतानुसार न्यायालयात हे आरक्षण टिकणार नाही. माझ्याही मनात याबाबत शंका आहे. हा प्रश्न सुटला तर मला आनंदच होईल असेही पुढे बोलताना स्पष्ट केले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, २०१४ साली असेच विधेयक मंजूर केले होते. पण ते विधेयक मुंबई उच्च न्यायालयात टिकले. पण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. पुन्हा तेच विधेयक विधिमंडळात मंजूर करण्यात आले. परंतु ज्या मागासवर्ग आयोगाच्या अहवालाच्या आधार घेण्यात आला. तो अहवाल बघावा लागेल. तो अहवाल अत्यंत महत्वाचा असून या सर्वांचा अभ्यास करूनच काही सांगता येईल असेही सांगितले.

अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशावर बोलताना शरद पवार म्हणाले की, अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाबाबत आश्चर्य वाटले नाही. कारण केंद्र सरकारने जी श्वेत पत्रिका जारी केली. त्या श्वेत पत्रिकेत अशोक चव्हाण यांचा उल्लेख करण्यात आला होता. चव्हाण यांचा उल्लेख म्हणजे एका इशाऱ्याची शक्यता होती असे सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच चंदिगढप्रकरणी हस्तक्षेप करत भाजपाच्या महापौराची निवड अवैध ठरविली. त्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, सत्तेच्या गैरवापराचे चंदिगड प्रकरण हे एक उत्तर उदाहरण आहे. पक्षाची स्थापना मी केली, पण पक्षाचे नाव आणि चिन्ह काढून दुसऱ्याला दिलं. चंदिगढ मध्ये जस आम आदमी पार्टीचे जसं झालं तसं आमचं झालं. याप्रकरणी निवडणूक आयोगाला आम्ही भेटण्यासाठी पत्र पाठवलं. पण त्यांनी तुमचं काम योग्य झालं असल्याचं उत्तर दिलं. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. निवडणूक आयोगाच्या कामात काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे असा सूचक इशाराही दिला.

भाजपाच्या ४०० पार घोषणेबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, भाजपाला विजयाची खात्री नाही. काही राज्य अस्थिर करण्यासाठी भाजपाचा प्रयत्न आहे. सर्व्हेनुसार ५० टक्के जागा आमच्या लोकांना मिळत आहेत. यंत्रणांचा वापर करून फोडाफोडी केली जात आहे. आता त्यांचेच लोक म्हणतायत मोदी है तो मुमकीन है असे सांगत आहेत. आणि आता आम्ही तेच बघतोय असे सांगितले.

यावेळी शेवटी बोलताना शरद पवार यांना राहुल गांधी यांच्या सध्या सुरु असलेल्या भारत जोडो न्याय यात्रेबाबत बोलताना शरद पवार यांनी भारत जोडो न्याय यात्रेचे कौतुक करत म्हणाले की, भारत जोडो यात्रेचा परिणाम चांगला होतोय. भाजपाच्या ताब्यातील कर्नाटक आणि तेलंगणा राज्य खेचून घेण्यात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे मदत झाल्याचे सांगितले.

Check Also

नाना पटोले यांचे टीकास्त्र, नरेंद्र मोदी फेल झालेले इंजिन…

नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात देशाला अधोगतीकडे नेले आहे. मोदींनी जनतेला दिलेले एकही आश्वासन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *