Breaking News

पुण्यातील शिवसृष्टीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा आराखडा तयार करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी

पुणे हे (शिवनेरी, ता. जुन्नर) छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मगाव असून शिवाजी महाराजांचे जास्तीत जास्त वास्तव्यही पुणे जिल्ह्यातच झाले. यामुळे या भागातील नियोजित शिवसृष्टी ही आंतरराष्ट्रीय दर्जाची व ऐतिहासिक व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत शिवसृष्टी व मेट्रो हे दोन्ही प्रकल्प एकत्रित सुरू होण्यासाठी त्वरित महापालिका व रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्वरित प्रारूप आराखडा सादर करण्याचे आदेश दिले.

सह्याद्री अतिथीगृहात पुण्यातील शिवसृष्टी व मेट्रोबाबतच्या कामाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविण्यात आली. या बैठकीस पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, आमदार मेधा कुलकर्णी, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, नगर विकासचे प्रधान सचिव नितीन करीर, पुणे मनपा आयुक्त कुणाल कुमार, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, गटनेते श्रीनाथ भिमाले, कला दिग्दर्शक नितीन देसाई, मेट्रोचे अधिकारी आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होताना वरील माहिती दिली.

पुण्यातील शिवसृष्टी ऐतिहासिक व्हावी यासाठी मनपाने शिवसृष्टीला मदत करावी. बीडीपीच्या (जैव विविधता उद्यान) जागेबाबत किती जागा हवी, टीडीआर किती ? याचा निर्णय सर्वांना सोबत घेऊन त्वरित घ्या. जगभरातील पर्यटक शिवसृष्टी पाहण्यासाठी येणार असल्याने मेट्रोनेही शिवसृष्टी ते रामवाडी दरम्यान स्टेशन निर्माण करावेत असे आदेश त्यांनी दिले.

तसेच बीडीपीच्या आजूबाजूला झोपडपट्टी निर्माण होणार नाही, याची दक्षताही मनपाने घ्यावी अशी ताकिदही त्यांनी यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली.

बीडीपीचा प्रश्न त्वरित सोडविण्यात येईल, मात्र यातील अंतर्गत रस्त्यांचाही विचार व्हावा. यावेळी मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी मेट्रोचे तर मनपाच्या तयारीविषयी आयुक्य कुणाल कुमार तर शिवसृष्टीबाबत नितीन देसाई यांनी सादरीकरण केल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी दिली.

काय असेल शिवसृष्टीत

 या शिवसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ले व जीवनावर भर

 महाराजांच्या जीवनातील नऊ प्रसंग व स्थापत्यशास्त्र यांचा सुंदर मिलाप

 अफजलखान भेटीचे विविध प्रसंग

 एक्सप्रेस वे पासून दिसेल अशी भव्यता

 येणाऱ्या पर्यटकांना स्फूर्ती मिळेल यावर भर

 स्थानिक लोक कलाकारांनाही यात स्थान

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *