Breaking News

बारामतीत आता नणंद सुप्रिया सुळे आणि भावजय सुनेत्रा पवार मध्ये अधिकृत लढत

बारामती या शरद पवार यांच्या बालेकिल्ल्याला भाजपाने पध्दतशीर राजकीय ईडी-सीबीआयचा सुरुंग लावल्यानंतर पवार कुटुंबिय कधी नव्हे ते एकमेकांच्या राजकिय विरोधात उभे राहिले. अजित पवार यांच्यावरील आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळच्या सभेत केल्यानंतर एका आठवड्याच्या आत अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित भाजपासोबत सत्तेत सहभागीही झाले. मात्र आता लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने अधिकृतरित्या सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहिर केली. त्यानंतर काही तासांच्या आतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचीही अधिकृत उमेदवारी जाहिर केली. त्यामुळे बारामतीत आता नणंद-भावजय अधिकृतरित्या एकमेकींच्या विरोधात लढणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनीच जाहिर केल्याप्रमाणे येणाऱ्या निवडणूकीत अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा अजित पवार आणि त्यांची दोन मुले वगळता बाकी कुटुंबिय विरोधात असतील अशी शंका जाहिरपणे व्यक्त केली. त्यानुसार शरद पवार यांच्या कन्या तथा अजित पवार यांच्या भगिणी सुप्रिया सुळे या मागील तीन ते चार टर्म बारामती लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात. परंतु आता घरातील भाऊच आता विरोधात गेल्याने सुप्रिया सुळे यांना त्यांच्या राजकिय अस्तित्वासाठी आणि भावाशी आणि त्याच्या पत्नीशी दोन हात करण्यासाठी तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांनी पतीच्या बाजूने राजकिय वजन कायम ठेवण्यासाठी पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात नणंदेच्या विरोधात उमेदवारी जाहिर केली.

आजस्थितीला अजित पवार आणि शरद पवार या दोघांचे समर्थक आणि आता सुप्रिया सुळे यांचे समर्थक कार्यकर्त्ये एकत्रितरित्या रहात होते. त्यामुळे बारामतीतील मतदार त्यांच्या स्वतःच्या अडचणीवर मात करण्यासाठी या तीघांपैकी कोणाकडेही जात होता. मात्र आता अजित पवार यांचा समर्थक कार्यकर्ता अजित पवार यांच्याकडेच जातो. तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा निष्ठावान कार्यकर्ता त्यांच्याकडेच जातो.

परंतु पवार कुटुंबियामध्ये आता भाजपा आल्याने अजित पवार यांना भाजपाच्या कलाने घेण्याची पाळी आली आहे. तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना नेहमीप्रमाणे पुरोगामीत्वाची भूमिका कायम घेवून चालावे लागणार आहे. परंतु या सगळ्या घडामोडीत कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं असे सांगणारे पवार कुटुंबिय लोकसभा निवडणूकीचा रणसंग्राम आणि त्यानंतर लागणाऱ्या निकालानंतर खरेच पूर्वीप्रमाणे एकत्र कुटुंब म्हणून राहणार का असा सवाल बारामतीकरांबरोबरच समस्त राज्यातील जनतेला पडला आहे.

त्यामुळे नणद-भावजयीच्या लढाईत नेमकं कोण बाजी मारतं हे येणारा काळच ठरणार आहे. मात्र आतापर्यंतची इतिहासातील आणि जगरीती पाहता भावासाठी बहिणीला नेहमीच रणसंग्रामात पराभवाचा सामना करावा लागला तर पतीच्या कुटुंबियासाठी पत्नीलाही अनेकदा माघारच (पराभव) घ्यावी लागली. नणंद भावजयमधील नेमकं कोण माघार अर्थात पराभूत होणार याचे उत्तर जनता म्हणून लोकसभा निवडणूकीचा निकाल लागेपर्यंत वाटच पहावी लागणार आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *