Breaking News

अदानी भेटले अजित पवार गेले भाजपासोबत आता शरद पवारच गेले अदानीच्या घरी भेटीवरून रोहित पवार यांचे वक्तव्य

राज्यात एकाचवेळी सत्ताधारी आणि विरोधकांशी तितक्याच घनिष्ट मैत्रीचे पालन करणारे आणि राजकारण आणि व्यक्तीगत मैत्री कोणतीही गल्लत न करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रत्येक कृत्याचा अर्थ काढणे त्यामुळेच कठीण होऊन बसते. वास्तविक पाहता अदानी उद्योग समुहाचे प्रमुख गौतम अदानी आले ते पहिल्यांदा बारामतीत शरद पवार यांच्या एका संस्थेच्या कार्यक्रमासाठी. त्यानंतर दोनदा आले ते मुंबईतील पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी, त्यानंतर शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हे थेट भाजपाच्या सोबतीला गेले आणि सत्तेत सहभागी झाले. तसेच हिंडेनबर्ग प्रकरणात गौतम अदानी यांच्या विरोधात जेपीसीची मागणी करणाऱ्या काँग्रेसच्या मागणीतील हवाही काढून घ्यायचे काम याच काळात शरद पवार यांनी केले. मात्र आता या मोठ्या घडामोडीनंतर शरद पवार हेच गौतम अदानी यांच्या घरी एका कार्यक्रमाला गेले. त्यामुळे आता भविष्यात काय होणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे.

रोहित पवार म्हणाले, शरद पवार अदानी आणि अंबानी यांची भेट घेतात. छोट्या व्यावसायिकांनाही भेटतात. आपल्या देशाचा विकास कसा करता येईल? याबाबत सगळ्यांमध्ये चर्चा होत असते. त्यावर पॉलिसी करत असतात. सगळ्या घटकांना भेटल्याशिवाय पॉलिसी करता येत नाही.

शरद पवार आणि गौतम अदानी भेटीवर मंत्री गिरीश महाजन यांनीही प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, शरद पवार यांच्या मनात काय आहे? हे कुणी सांगू शकत नाही. ते अंतरयामी आहेत. त्यामुळे मनात, पोटात आणि ओठात काय हे शरद पवार यांनाच माहिती असते. शरद पवार हे अदानींचे मित्र आहेत, असं सांगितलं.

दरम्यान, गौतम अदानी शरद पवार यांच्या भेटीनंतरच राज्यातील राजकारणात उलथापालथ झाल्याचा अंदाज आतापर्यंत बांधण्यात आलेला आहे. यावेळी मात्र शरद पवार हेच गुजरातमधील गौतम अदानी यांच्या घरी गेल्याने नेमके भाजपामध्ये काय घडणार की पुन्हा राज्याच्या राजकारणात काही वेगळे घडणार याकडे राजकिय जाणकारांचे लक्ष्य लागले आहे.

Check Also

माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आता एकांगी की चुरसीची ?

लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु झालेली असतानाच काही लोकसभा मतदारसंघातील लढती या फारच रंजक होणार असल्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *