Breaking News

शरद पवार यांचा इशारा, …आता माघार नाही ज्यांच्याकडून शिकला त्यांच्याबद्दल योग्य भावना ठेवा नाहीतर जनता योग्य जागा दाखवेल अजित पवार गटाला यांना टोला

आता वेळ आलेलेली आहे. चुकीच्या लोकांना आवरायचं आहे. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. व्यासपीठावर आज काही लोक आहेत. ते आमच्याबरोबर राजकारणात नव्हते. पण काहीतरी मुद्दे काढून त्यांना तुरुंगात टाकले जाते. विशेषतः परळीत या गोष्टी अधिक होत आहेत. सत्तेचा गैरवापर करत लोकांना तुरुंगात डांबून कोणी वेगळं राजकारण करत असेल त्यांना उलथून टाकण्यासाठी कधीही वेळ लागणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रसचे (शरद पवार गट) प्रमुख शरद पवार यांनी इशारा देत ते करायला आमचे लोक तयार झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे आता माघार नाही असे ठणकावून सांगितले.

बीड येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाभिमानी सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मंत्री धनंजय मुंडे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपाला इशारा दिला.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, बऱ्याच दिवसांनी आज बीडला संदीप क्षीरसागरांनी आयोजित केलेल्या सभेला उपस्थित राहता आले. तुम्ही लोकांनी केलेले उत्स्फूर्त स्वागत पाहून मला जुन्या काळाची आठवण झाली. ती आठवण म्हणजे निष्ठेच्या बाबतीत बीड कधीही तडजोड करत नाही, त्यांच्या पाठीशी जनता उभी राहते हे संदीप क्षीरसागर यांनी दाखवून दिले असे सांगत बीडच्या माजी आमदार केशरकाकू क्षीरसागर यांचे कौतुकही यावेळी केले आहे.

शरद पवार सविस्तर बोलताना म्हणाले की महराष्ट्रात आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने काम करत होतो. त्यावेळी खऱ्या नेतृत्वापेक्षा काही लोकांनी वेगळी भूमिका मांडायला सुरुवात केली. सामान्य जनता अस्वस्थ होती. त्यावेळी बीडचे नेतृत्व केशरकाकू क्षीरसागर यांच्याकडे होतं. त्यांनी भूमिका घेतली की, नेत्याच्या निष्ठेच्या संदर्भात मी तडजोड करणार नाही. त्याला जमेल ते करावं लागलं पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण मी भूमिकेपासून मागे हटणार नाही अशी भूमिका केशरकाकूंनी घेतली होती. तीच स्थिती काकूंचे नातू संदीप क्षीरसागर यांनी आणली याचा मला आनंद आहे असेही स्पष्टपणे सांगितले.

शरद पवार म्हणाले की, चमत्कारिक लोकांच्या हातात आज सत्ता आहे. कष्टकऱ्यांबाबत त्यांना आस्था नाही. समाजात फूट पाडण्याची त्यांची भूमिका आहे. आज देशात किती प्रश्न आहेत. महागाई, खतांच्या किमंती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. शेतकरी आज अडचणीत आहे. पण सरकारला चिंता नाही. कायदा व सुव्यवस्थेची चिंता सरकारला नाही. मणिपूर, नागालॅंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची समस्या आहे. मणिपूरमध्ये समाजात गावांत भांडणं झाली. अनेकांच्या घरांवर हल्ले केले जात आहेत. स्त्रीयांची धिंड काढली जात आहे. पण भाजपा सरकार कोणतेही पाऊल उचल नाही. देशाच्या पंतप्रधानांनी मणिपूरला जाण्याची आवश्यकता होती. पण त्यांनी तिकडे ढुंकूनही पाहिले नाही. अधिवेशनात अवघे तीन मिनिटे बोलले. पण पंतप्रधानांनी मणिपूरच्या भगिनींचे दुःख जाणून घेतले नाही असेही यावेळी सांगितले.

शरद पवार पुढे म्हणाले की, लोकांनी निवडून दिलेली सरकारे पाडण्याचे काम भाजपाकडून केले जात आहे. स्थिर सरकार देण्याची घोषणा करता आणि केंद्रातील सत्तेच्या जोरावर विरोधकांची सरकारं उलथवून टाकता. त्यातून सामान्य जनतेचे जीवनही उद्‌ध्वस्त केली जात आहेत. ज्यांना आपण सत्ता दिली ते लोक योग्य पद्धतीने वागत नाहीत. ठाण्यातील सरकारी रुग्णालयात १८ लोकांचे जीव गेले. जखमींना आधार देण्याची जबाबदारी रुग्णालयांवर असताना त्याच रुग्णालयांत लोक मृत्युमुखी पडतात. त्याबाबत राज्य सरकार बघ्याची भूमिका घेते हे राज्य कसे चालेले आहे आणि कुठे चालेले आहे. हे आपण सर्वजण बघत आहोत.
सध्या देशात बसलेल्या सरकारला जनतेच्या प्रश्नांशी काही घेणं-देणं नाही. सध्याच्या घडीला न परवडणारी स्थिती ही शेतीची झाली आहे. कष्टकरी, मजूर, कामगार हा सगळा वर्ग अडचणीत आहे आणि या केंद्र सरकारला त्याविषयीची चिंता नाही. मणिपूरला पंतप्रधान नरेंद्र मोदी का गेले नाहीत? असा सवालही यावेळी उपस्थित केला.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही जबाबदारी केंद्र सरकारची असते. आज मणिपूरची अवस्था काय आहे? मणिपूर, नागालँड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश ही छोटी राज्यं आहेत पण ही महत्त्वाची राज्यं आहेत. प्रत्येक राज्याच्या शेजारी पाकिस्तान तरी आहे किंवा चीन तरी आहे. या दोन्ही देशांची नजर चांगली नाही. संकट आलं तर काय होईल तिथून काय होईल यासाठी भारतीय लष्कराला सतर्क रहावं लागतं. मणिपूर हे सध्या अशांत आहे. आज मणिपूर पेटलं आहे. समाजा समाजात भांडण झालं अंतर पडलं. एक वर्ग विरुद्ध दुसरा वर्ग असा तिढा निर्माण झाला. तिथे हल्ले होत आहेत, उद्योग नष्ट केले जात आहेत. स्त्रियांची धिंड काढली जाते आहे. हे सगळं होत असताना देशात बसलेलं भाजपाचं सरकार कुठल्याच प्रकारची पावलं टाकत नाही अशी टीकाही केली.

आज ही स्थिती अनेक ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळते. ही स्थिती बदलायची असेल तर वेगळा विचार करावा लागेल असेही शरद पवार यांनी बीडमधल्या सभेत सूचक इशारा भाजपाला दिला.

यावेळी शरद पवार म्हणाले, ज्यांच्यापासून राजकारण शिकले म्हणता आणि त्यांचा योग्य भावना ठेवा नाही तर बीडकर जनता तुम्हाला जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देत पक्षात काहीजणांनी वेगळी भूमिका घेतली. मात्र ते म्हणतात माझं वय झालं. पण तुम्ही माझं वय झालेलं पाहिलंत अजून काय पाहिलंत असा खोचक टोलाही शरद पवार यांनी अजित पवार गटाला लगावला.

यावेळी शरद पवार यांनी मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. मात्र सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर न बोलता त्यांना परत येण्याची चिंता सतावत आहे. त्यामुळेच नरेंद्र मोदी यांनी मी परत येईन परत येईन म्हणाले. राज्याचे एक मुख्यमंत्री राहिलेला व्यक्तीही हेच म्हणत होता. पण तो आला परत पण खालच्या पदावर आल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार फौजिया खान, आमदार रोहित पवार, आमदार अनिल देशमुख, आमदार राजेश टोपे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, सुनील भुसारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे, आमदार संदीप क्षीरसागर हे नेते उपस्थित होते.

Check Also

नाना पटोले यांचे टीकास्त्र, नरेंद्र मोदी फेल झालेले इंजिन…

नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात देशाला अधोगतीकडे नेले आहे. मोदींनी जनतेला दिलेले एकही आश्वासन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *