Breaking News

ठरलं, नितीशकुमार पु्न्हा मुख्यमंत्री तर भाजपाचे हे दोन आमदार उपमुख्यमंत्री

बिहारमधील राजकिय उलथापालथीला अखेर दृष्यरूप येत असून भाजपाची साथ सोडून इंडिया आघाडीत सहभागी झालेले बिहारचे मुख्यमंत्री तथा जनता दल संयुक्तचे प्रमुख नितीनकुमार यांनी पुन्हा राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर स्थापन केलेल्या सरकारचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच भाजपा आणि जीतनराम माझी यांच्या पाठिंब्यावर नव्या सरकार स्थापनेचा दावा केला. या नव्या सरकारमध्ये नितीशकुमार हे ९ व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर भाजपाचे सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा हे दोघेजण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून राज्यपाल भवनात संध्याकाळी ५ वाजता या नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

साधारणत, दोन-तीन वर्षापूर्वी जनता दल संयुक्त ला महाराष्ट्रातील शिवसेनेप्रमाणे फोडण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येत असल्याचा आरोप मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपावर करत त्या सरकारचा राजीनामा दिला. त्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या राजद आणि काँग्रेसबरोबर आघाडी करत बिहारच्या मुख्यमंत्री पदाची पुन्हा एकदा शपथ घेतली.

त्यानंतर भाजपाच्या पराभवासाठी देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी प्रयत्न करत इंडिया आघाडीची स्थापन केली. तसेच या विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त करत तसे प्रयत्नही सुरु केले. परंतु मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वावर वर आघाडीतील घटकपक्षांनी विश्वास ठेवण्याऐवजी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवित इंडिया आघाडीचे अध्यक्ष पद सर्व विरोधी पक्षांनी सोपविले. मात्र इंडिया आघाडीच्या निमंत्रक पद नितीशकुमार यांनी स्विकारावे अशी विनंती करण्यात आली. परंतु नितीशकुमार यांनी आघाडीचे निमंत्रक पद स्विकारण्याऐवजी या पदाची गरज नसल्याचे मत व्यक्त केले.

त्यातच आगामी लोकसभा निवडणूकीच्यादृष्टीने भाजपाने बिहारचे पहिले मुख्यमत्री कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारत रत्न देण्याची घोषणा नुकतीच काही दिवसांपूर्वी जाहिर केली. त्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी कर्पुरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमात लालू प्रसाद यादव यांच्या राजद आणि काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष टीका करत इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले. तसेच राजद आणि काँग्रेसची साथ सोडत नितीशकुमार हे पुन्हा एकदा भाजपाबरोबर जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानुसार अखेर भाजपामधील दोन उपमुख्यमंत्र्यांसह नितीश कुमार मुख्यमंत्री पदाची आज रविवारी संध्याकाळी ५ वाजता शपथ घेणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, सकाळी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा नितीशकुमार यांनी दिल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, महागंठबंधन सरकारमधील राष्ट्रीय जनता दलाशी चांगले संबध राहिले नसल्याने आपण मुख्यमंत्री पदाचा आणि महागठबंधन सरकारचा राजीनामा देत असल्याचे सांगत राष्ट्रीय जनता दलाकडूनही सातत्याने घराणेशाहीचाच पुरस्कार करण्यात येत असल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले.

Check Also

पंतप्रधान मोदी यांचे टीकास्त्र, शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ

दुष्काळग्रस्त माढ्यात पाणी पोहोचवितो अशी शपथ घेऊन पंधऱा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने शेतकऱ्यांची फसवणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *