Breaking News

नितीशकुमार यांच्या त्या वक्तव्याने इंडिया आघाडीच्या ऐक्यावर प्रश्नचिन्ह

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील शिवसेना पक्षात बंडखोरी घडवून आणत एका पक्षाचे दोन पक्ष करण्यात आले. तोच प्रकार बिहारमधील भाजपाचा एकेकाळचा सहकारी पक्ष असलेल्या जनता दल युनाटेडसोबतही करण्यात आल्याचा प्रकार स्वतः बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी उघडकीस आणला. त्यानंतर भाजपाच्या पराभवासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याची किमया साधण्यातही नितीशकुमार यांनी साधली. मात्र राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने दुखावल्या गेलेल्या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बँनर्जी यांच्या पाठोपाठ आता जनता दल युनायटेड चे प्रमुख तथा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आज अप्रत्यक्ष निशाणा साधला.

केंद्रातील भाजपा सरकारकडून बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहिर केला. त्यानंतर आज बिहार येथील आयोजित कार्यक्रमात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेवरून आणि जननायक या पदवीवरून चांगलाच निशाणा साधत पुन्हा एकदा घराणेशाहीवरून अप्रत्यक्ष टीका केली.

आज बिहार मध्ये झालेल्या एका कार्यक्रमा दरम्यान मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी काँग्रेसकडून काढण्यात आलेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा उल्लेख न करता म्हणाले की, काही लोक आजकाल कर्पुरी ठाकूर यांचे गुणगान गात आहेत. तर त्यांच्याच हाताखाली राजकारण शिकलेले लोक स्वतःच्याच घराण्याला पुढे करत आहेत. कर्पुरी ठाकूर यांच्याप्रमाणेच जननायक उपाधी लावून फिरत आहेत. मात्र मी त्यांना सांगू इच्छितो की, मी ही कर्पुरी ठाकूर यांच्या हाताखाली राजकारण शिकलो असून त्यांनी शिकविलेल्या गोष्टीनुसार मी कधीही माझ्या घरातील व्यक्तीला राजकारणात पुढे केले नाही. मात्र काहीजण आपल्याच घरातील व्यक्तीला पुढे करत असल्याची अप्रत्यक्ष टीका बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केली.

तर दुसऱ्याबाजूला ममता बँनर्जी यांनीही पश्चिम बंगालमध्ये आलेल्या भारत जोडो न्याय यात्रेची कोणतीही माहिती रितसर कळविली नसल्याने आणि आगामी लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने जागा वाटपाच्या प्रस्तावावर काँग्रेसकडून जाणीवपूर्वक चालढकल केली जात असल्याचा आरोप करत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. त्यामुळे इंडिया आघाडीत बिघाडी सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.

तर दुसऱ्याबाजूला इंडिया आघाडीची मोट बांधण्यासाठी सुरुवातीला नितीशकुमार यांनी पुढाकार घेत इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची अप्रत्यक्ष इच्छा व्यक्त केली होती. परंतु काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीच्या ऑनलाईन बैठकीत इंडिया आघाडीच्या नेतृत्वाची धुरा अद्याप जरी अधिकृत जाहिर करण्यात आलेली नसली तरी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे सोपविल्याचे सांगण्यात येत आहे. तर नितीशकुमार यांच्याकडे संयोजक म्हणून जबाबदारी सोपवून काँग्रेसकडून बोळवण करण्याचा प्रयत्न केला. परंतु नितीशकुमार यांनी संयोजक पद नाकारल्याने या आघाडीतील बिघाडी निर्माण होण्याला एक मजबूत कारण मिळाल्याची चर्चा सुरु झाली. यापार्श्वभूमीवर नितीशकुमार इंडिया आघाडीतून बाजूला होऊन पुन्हा एकदा भाजपाशी संधान बांधणार असल्याच्या चर्चेला जोर चढला आहे.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *