Breaking News

शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेण्याचे का जाहिर केले? वाचा त्यांचे संपूर्ण भाषण, भाषणातच सांगितली कारणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय जीवनाबाबत मोठी घोषणा आज दुपारी केली. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या “लोक माझे सांगाती” या सुधारीत राजकिय आत्मचरित्राचा प्रकाशन प्रसंगीच “प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठे तरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे, असं शरद पवारांनी जाहीर केला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
मंगळवारी २ मे मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित ‘लोक माझे सांगाती’ या त्यांच्या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.

शरद पवार म्हणाले, १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तेव्हापासून गेली २४ वर्षे राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सार्वजनिक जीवनातील १ मे १९६० पासून सुरू झालेला हा संपुर्ण प्रवास गेली ६३ वर्षे अविरत चालू आहे. त्यापैकी ५६ वर्षे मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य किंवा मंत्री म्हणून सातत्याने काम करत आहे. संसदेतील राज्यसभा सदस्यपदाची पुढील ३ वर्षे शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाधिक लक्ष घालण्यावर माझा भर असेल, याशिवाय मी कोणतीही अन्य जबाबदारी घेणार नाही असेही जाहिर केले.

सार्वजनिक जीवनातील १ मे, १९६० ते १ मे, २०२३ इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा माझा मानस आहे. तसेच युवक, युवती व विद्यार्थी यांच्या संघटनांकडे आणि कामगार, दलित, आदिवासी व समाजातील इतर कमकूवत घटकांच्या प्रश्नांकडे माझे लक्ष राहिल, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

शरद पवार पुढे म्हणाले, आपणास माहिती आहे की, माझा अनेक स्वयंसेवी संस्थांच्या कामकाजामध्ये सहभाग आहे. रयत शिक्षण संस्था (सातारा), विद्या प्रतिष्ठान (बारामती), मराठा मंदीर (मुंबई), महात्मा गांधी सर्वोदय संघ ( उरळी कांचन, पुणे) , शिवनगर विद्या प्रसारक मंडळ (बारामती), अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद (पुणे) या संस्थांमधून साडेचार लाखाहून अधिक विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेतात. तसेच मुंबई शहरामध्ये वैज्ञानिक क्षेत्राला प्रोत्साहित करणारे नेहरू सेंटर, महाराष्ट्राच्या प्रश्नांसंबंधी अभ्यास करणारे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, वाचन संस्कृतीला प्रोत्साहित करणारी, काही लाख ग्रंथांचे संवर्धन करणारी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय संस्था, पुणे जिल्ह्यातील मांजरी बु. येथील ऊस व साखर कारखानदारी क्षेत्रात संशोधन- विस्तार कार्य करणारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यासारख्या अनेक संस्थांची मी जबाबदारी सांभाळत आहे व माझे योगदान देत आहे. या कार्यावर यापुढे मी अधिक लक्ष देणार आहे.

गेल्या ६० वर्षांत महाराष्ट्राने व आपण सर्वांनी मला खंबीर साथ व प्रेम दिले, हे मी विसरू शकत नाही. परंतू यापुढे पक्ष संघटनेच्या संदर्भात पुढील दिशा ठरवणे आवश्यक वाटते. रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांची एक समिती गठीत करावी असे मी सुचवू इच्छितो, असं शरद पवारांनी नमूद केलं.

अध्यक्ष पदाच्या समितीच्या सदस्य पदी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड. इतर सदस्य : फौजिया खान, (अध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस), धीरज शर्मा, (अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस), सोनिया दूहन, (अध्यक्षा, राष्ट्रवादी युवती काँग्रेस आणि अध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस) समावेश करण्यात आल्याचे सांगितले.

ही समिती अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेईल आणि पक्ष संघटना वाढीसाठी, पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोचवण्यासाठी, जनसेवेसाठी सातत्याने झटत राहिल असा मी विश्वास व्यक्त करतो, असंही शरद पवारांनी नमूद केलं.

शरद पवार पुढे म्हणाले, माझ्या सहकाऱ्यांनो, मी अध्यक्षपदावरून जरी निवृत्त होत असलो तरी माझी सार्वजनिक कार्यातून निवृत्ती नाही. मी सहा दशकांहून अधिक काळ जनमाणसांत काम करीत आलो आहे, त्या सेवेत कुठलाही खंड पडणार नाही. उलट सार्वजनिक कार्यात मला अधिक वेळ देता येईल. मी पुणे, बारामती, मुंबई, दिल्ली अथवा कुठेही असू आपणा सर्वांसाठी नेहमीप्रमाणे भल्या सकाळपासून उपलब्ध राहिल. जनतेच्या अडीअडचणी, प्रश्न यांच्या सोडवणूकीसाठी अहोरात्र कष्ट घेत राहिल असे सांगितले.

सततचा प्रवास हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. मी आपल्या भेटीसाठी सार्वजनिक कार्यक्रम, सभा – समारंभाना येत राहिल. आपणाशी संवाद साधण्यासाठी, आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी, आपली गाऱ्हाणी ऐकण्यासाठी आणि सरकारकडे मांडण्यासाठी माझी पायपीट अविरतपणे चालू राहिल. जनतेचे प्रेम आणि विश्वास हाच माझा श्वास आहे. त्यामुळे आपणापासून कोणतीही फारकत नाही. मी आपणासोबत होतो, आहे व शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहणार! त्यामुळे भेटत राहू, असं शरद पवारांनी नमूद केलं.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *