Breaking News

नाना पटोले यांचा सवाल,… मीरा बोरवणकरांनी उल्लेख केलेले ‘दादा’ कोण? भाजपा आरक्षण देऊ शकत नाही, सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसच आरक्षणाचा प्रश्न सोडवेल

राज्यात सध्या मराठा, ओबीसी, धनगर समाजाकडून आरक्षणाची जोरदार मागणी केली जात असून त्यांची मागणी रास्तच आहे. भारतीय जनता पक्षाने २०१४ पासून या समाजांना आरक्षण देण्याचे पोकळ आश्वासन दिले आहे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असूनही त्यांनी कोणत्याच समाजाला आरक्षण दिलेले नाही, त्यांनी या समाजाची फसवणूक केली आहे. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर जातनिहाय जनगणना केली पाहिजे आणि काँग्रेस सत्तेत आल्यानंतर जातनिहाय जनगणना होईल व आरक्षणचा प्रश्नही मार्गी लावेल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यात मागील काही दिवसांपासून आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे. आरक्षणावरून दोन समाजात वाद निर्माण करुन राजकीय पोळी भाजण्याचे पाप भाजपा करत आहे. ओबीसींच्या आरक्षणाला हात लावणार नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये सांगतात व तेच फडणवीस मराठा भाजपाचे आरक्षण मीच देऊ शकतो अशी वल्गणा करतात पण प्रत्यक्षात दोन्ही समाजाची ते दिशाभूल करत आहेत. आरक्षणचा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर केंद्र सरकार तातडीने करु शकते. जातनिहाय जनगणना हा त्यावरील महत्वाचा मार्ग आहे पण भाजपाचा जातनिहाय जनगणनेस विरोध आहे. काँग्रेस पक्ष, मल्लिकार्जून खर्गे जी, सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांनी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केलेली आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासनही दिलेले आहे.

जनतेच्या पैशातून लंडन पर्यटन
नाना पटोले म्हणाले, राज्यातील अनेक भागात कमी पाऊस पडलेला आहे, मराठवाड्यातील परिस्थितीही गंभीर आहे, ७ तारखेपासून महाराष्ट्राचा दौरा करुन आम्ही परिस्थिती पाहिली, लोकांशी संवाद साधला. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा यासह अनेक प्रश्न आहेत. शेतकरी, कामगार, सर्वसामान्य लोक त्रस्त आहेत, सरकारने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत आहे पण सरकारला त्याचे काहीच गांभिर्य नाही. दोन-तीन कॅबिनेट मिटिंग झाल्या पण त्यात दुष्काळावर चर्चा सुद्धा झाली नाही. या येड्याच्या (EDA) सरकारला जनतेचे काहीही देणेघेणे नाही. एक मंत्री सत्कार करुन घेण्यात मग्न आहेत तर दुसरे मंत्री छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे आणतो म्हणून जनतेच्या पैशावर ‘लंडन पर्यटन’ करुन आले व स्वतःचाच सत्कार करुन घेत फिरत आहेत.

आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी उल्लेख केलेला दादा कोण?
तसेच पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकात, येरवड्याच्या जमीन घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करत तत्कालीन पालकमंत्री ‘दादा’ यांचा त्यासाठी दबाव होता असा उल्लेख केला आहे. बोरवणकरांनी उल्लेख केलेले मंत्री ‘दादा’ कोण? हे जनतेला कळाले पाहिजे. या सरकारबद्दल पोलीस प्रशासनात तीव्र नाराजी आहे, फोन टॅपिंग प्रकरणाने प्रतिमा डागळलेल्या रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक बनवण्याचा घाट भाजपाच्या काही लोकांनी घातला होता. राज्यात काय चाललंय? असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित करत एखाद्या अधिकाऱ्याने घोटाळ्याबद्दल वक्तव्य केले तर त्यांच्याविरोधात आंदोलन करण्याची धमकी कसली देता? जर तुम्ही काही केलेले नाही, तर घाबरता कशाला? असा सवालही उपस्थित केला.

लोक घरातही सुरक्षित नाहीत आणि बाहेरही सुरक्षित नाहीत..

समृद्धी महामार्गावर वैजापूर येथे अपघात होऊन १२ लोकांचा मृत्यू झाला ही अत्यंत दुःखद घटना आहे. मागील ९ महिन्यात समृद्धी महामार्गावर ८६० अपघात झाले व त्यात एक हजार लोक मरण पावले आहेत, जखमीही झाले आहेत. अपघात झाले की सरकार चौकशी करण्याची घोषणा करते, अशा किती चौकशा करणार? आणि याआधी घोषणा केलेल्या चौकशांचे काय झाले? याचे उत्तर आधी द्या. या महामार्गाने कोणाची समृद्धी झाली हे सर्वांना माहित आहे. भाजपाप्रणित शिंदे सरकारच्या काळात लोक घरातही सुरक्षित नाहीत आणि बाहेर रस्त्यावर आले तर रस्त्यावरही सुरक्षित नाहीत, असा संताप नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

Check Also

निर्मला सीतारामन यांची सॅम पित्रोदांच्या वर्णद्वेषी टिप्पणीवरून टीका

आंतरराष्ट्रीय ख्यातकिर्त विचारवंत शास्त्रज्ञ आणि काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी आज एक व्हिडिओ जारी करत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *