Breaking News

उद्धव ठाकरे यांची बैठकीनंतर स्पष्टोक्ती, मतभेद असतील पण आम्ही…

भाजपाच्या मनमानी आणि हुकूमशाही पध्दतीच्या कारभाराच्या विरोधाच जवळपास २० हून अधिक राजकिय पक्ष एकत्र येत आज बिहारच्या पाटण्यात आयोजित बैठकीसाठी आले होते. या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असून निवडणुका एकत्र लढवण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिली. बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित सर्व नेत्यांनी आपली मते मांडली. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आजच्या बैठकीवरून भाष्य केले.

यावेळी उध्दव ठाकरे म्हणाले, देशातील सर्व पक्षातील प्रमुख नेते येथे आले आहेत. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सर्व नेते येथे आले आहेत. वेगवेगळ्या पक्षाचे नेते असल्याने आमच्यात मतभेद असतील, पण देश एक आहे. देशाला वाचवण्यासाठी, देशाची एकता आणि अखंडता कायम राखण्यासाठी एकत्र आलो आहोत. जेव्हा केव्हा देशातील स्वातंत्र्यावर आघात केला जाईल तेव्हा आम्ही विरोध करणार आहोत. विरोधकांची एकता होईल की नाही अशी शंका निर्माण केली जाते. पण मी स्वतःला विरोधक मानतच नाही. पण जे देशद्रोही आहेत, जे देशात हुकुमशाही आणू इच्छितात त्याविरोधात आम्ही उभे राहणार आहोत. सुरुवात चांगली झाली की पुढेही सर्व चांगलं होतं, असे सांगितले.

पुढे बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, सर्व नेते भेटले. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत सर्व नेते आले आहेत. सर्व नेत्यांनी एक होऊन पुढे निवडणूक लढण्यासाठी एक कॉमन अजेंडा तयार करत आहोत. १० किंवा १२ जुलै रोजी शिमल्यामध्ये पुढची बैठक होणार आहे. या बैठकीत अजेंडा तयार केला जाईल. कोणत्या मुद्द्यांवर निर्णय घेतला जाईल, पुढे कसं चाललं पाहिजे. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने काम करावं लागणार आहे. कारण एकाच मुद्द्यावर प्रत्येक राज्यात चालून नाही चालणार. बिहार, तामिळनाडू, काश्मीर, महाराष्ट्रात काय करणं गरजेचं आहे याबाबत स्ट्रॅटेजी तयार केली जाईल. एकजूट होऊन २०२४ ची लढाई आपल्याला लढायची आहे. राहुल गांधींनी जिथे जिथे यात्रा केली, तेथील नेते आज आले आहेत, असंही म्हणाले.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, आज आपण देशात रोज एक नवीन समस्या पाहत आहोत. ठिकठिकाणी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजाच्या ऐक्यासाठी आज आपल्याला भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या साथीदारांचा सामना करावा लागणार आहे. आपण एकत्रितपणे त्याचा सामना केला पाहिजे. काही मतभेद असतील किंवा इतर असतील, पण राष्ट्रहितासाठी आम्ही परस्पर समस्यांकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मला विश्वास आहे की पाटण्यापासून ही सुरुवात देशात बदल घडवून आणण्यासाठी सुरू झाली आहे.

तसेच शरद पवार यांनी सांगितले की, जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली येथून एक संदेश दिल्याचे मला आठवते. त्यामुळे संपूर्ण देशात वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. येथून अनेक चळवळी सुरू झाल्या आणि देशाच्या इतिहासात त्याचा स्वीकार झाला. आजच्या परिस्थितीत नितीशजींनी ही बैठक बोलावली आणि सगळे मित्र इथे आले. बैठकीत झालेल्या चर्चेत एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून आमची नवी वाट दाखवण्याचे काम सुरू झाले आहे. मला पूर्ण विश्वास आहे की देशातील जनता त्याला साथ देईल, अशी आशाही व्यक्त केली.

Check Also

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रासाठी मागितल्या या गोष्टी, पण पंतप्रधान मोदींकडून साधा उल्लेखही नाही

स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यानुसार काँग्रेस विसर्जित झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *