मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा विरोध नाही, तर जाळ पोळ करणाऱ्या झुंड शाहीला आमचा विरोध आहे असे मत व्यक्त करत शिंदे समिती बरखास्त करून, दिलेले खोटे कुणबी प्रमाणपत्र तातडीने रद्द करण्यात यावे अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केली.
ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचावासाठी तसेच या बांधवांच्या न्याय हक्कासाठी आज हिंगोली येथील रामलीला मैदानावर राज्यातील ओबीसी नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा’ पार पाडली. यावेळी छगन भुजबळ बोलत होते. यावेळी लाखोंच्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते.
यावेळी ओबीसी जनमोर्चाचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे, माजी मंत्री आ.महादेव जानकर खासदार रामदास तडस,ओबीसी महासंघाचे डॉ.बबनराव तायवाडे,भटक्या विमुक्तांचे नेते प्रा.लक्ष्मण गायकवाड, आमदार राजेश राठोड, आमदार डॉ.प्रज्ञा सातव, मुस्लिम ओबीसी संघाचे शब्बीर अन्सारी,प्रा.टी.पी.मुंडे, माजी खासदार समीर भुजबळ, डॉ.बी.डी.चव्हाण, माजी आमदार रामराव वडकुते, प्रकाश राठोड, ॲड.सचिन नाईक, यांच्यासह सकल ओबीसी, भटके विमुक्त जाती, एसबीसी आणि अल्पसंख्याक समाज व हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकारी व ओबीसी बांधव लाखोंच्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जीवाची पर्वा न करता अनेक आंदोलने केली आहे आणि यापुढेही आंदोलने करण्याबाबत आपल्याला चिंता नाही. तुम्ही १७ सभा घेतल्या तेव्हा आम्ही केवळ एकच सभा घेतली. आमचं दुःख मांडताना आम्ही कुठलीही जाळपोळ केली नाही दगडफेक केली नाही. मात्र तुम्ही अनेकांची घर जाळली दगडफेक केली. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा विरोध नाही, तर जाळ पोळ करणाऱ्या झुंड शाहीला आमचा विरोध आहे असे सांगत पेटवायला अक्कल लागत नाही, पटवायला अक्कल लागते. जाळायला अक्कल लागत नाही, जुळवायला अक्कल लागते. मोडायला अक्कल लागत नाही, घडवायला अक्कल लागते अशी खोचक टीका यावेळी केली.
पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, ज्या शिव्या कोणी वाचू शकत नाहीत, अशा शिव्या गेले दोन महिने मी आणि माझे कुटुंब सातत्याने ऐकत आलोय. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आपल्याला त्याची पर्वा नाही आपण लढत राहू. आपल्याला जर आपले हक्क अबाधित ठेवायचे असतील तर…. अधिकार की लडाई में निमंत्रण नहीं भेजे जाते, जिसका जमीर जिंदा है वो खुद समर्थन में आ जाते हैं, हमारे हक पर जहां आँच आए टकराना जरूरी है, और तुम जिंदा हो, तो जिंदा नजर भी आना जरूरी है या शायारीतील पंक्तीतून उपस्थित ओबीसी बांधवांना आवाहन केले करत ओबीसी सभेला उपस्थित राहिलेल्या काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली.
यावेळी उपस्थित ओबीसी बांधवांसमोर छगन भुजबळ पुढे म्हणाले की, आपल्यातील मतभेद बाजूला ठेवून ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सर्वांनी बहुसंख्येने एकत्र यायला हवं. त्यासाठी कुणाचीही वाट न पाहता एकत्र येऊन गावागावात बैठका घ्या, सभा घ्या आणि एकत्र येऊन ओबीसींचा आवाज बुलंद करा असे आवाहन त्यांनी उपस्थित बांधवांना केले.
बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, मराठा आरक्षणाला आपला विरोध नाही, मात्र राज्यात मराठा कुणबीच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने दाखले वाटले जाताय, ते सर्व दाखले तातडीने रद्द करा. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जी शिंदे समिती नेमण्यात आली आहे ही समिती देखील बरखास्त करून मराठा समाजाच मागासलपण शोधण्याची गरज आहे. त्यासाठी निरगुडे आयोगाने केवळ मराठ्यांचे सर्वेक्षण न करता महाराष्ट्रातील सर्व जातींचे सर्वेक्षण करून त्यांचं मागासलेपण शोधण्याची गरज आहे. तेव्हाच सर्वांना न्याय मिळेल. त्यामुळे मराठा समाजाच एकट्याच सर्वेक्षण नको, सर्व समाजाचे सर्वेक्षण करा असे आवाहन केलं.
छगन भुजबळ म्हणाले की, भारतीय राज्यघटनेने सर्वांना देशात सर्वत्र फिरण्याचा अधिकार दिला आहे. बोलण्याचा अधिकार आणि स्वातंत्र दिले आहे. यामुळे कोणाला गावबंदी करता येऊ शकत नाही. गावबंदी केली तर एका महिन्याची शिक्षा करण्याची तरतूद आहे. ज्यांनी गावबंदीचे बोर्ड लावले त्यांना एका महिन्याच्या शिक्षा करा. आता सरकार कायद्याप्रमाणे कारवाई करणार आहे की नाही? पोलीस हे करणार आहे की नाही? राज्यात सर्वत्र लावलेले गावबंदीचे बोर्ड काढा. पोलिसांनी राज्यघटनेप्रमाणे कारवाई करावी, असा हल्लाबोल ओबीसी नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ आपल्याच सरकारवर केला.
तसेच राजेश टोपे, रोहित पवार यांचे तुम्ही स्वागत करता. त्यांच्यासाठी गावबंदी नाही, परंतु आमच्या नेत्यांना गावबंदी केली जात आहे, अशी खरमरीत टीकाही छगन भुजबळ यांनी केली.
छगन भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की, राहुल गांधी देशात जातीय जनगणनेची मागणी करत आहे. इतर पक्षातूनही ही मागणी पुढे येत आहे. मग एकादाची जातीय जनगणना करा आणि ‘दूध का दूध पानी का पानी’ होऊन जाऊ द्या. मग समजणार कोण मागास आहे. बिहार करु शकतो तर महाराष्ट्र का करु शकत नाही. जनगणनेत जे येईल, ते मान्य करायला आम्ही तयार आहोत, असेही यावेळी म्हणाले.
या सभेच्या पूर्वी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सर्व उपस्थित ओबीसी बांधवांनी २६-११ हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व वीर जवानांना आदरांजली अर्पण केली. आणि संविधान दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना छगन भुजबळ म्हणाले, आताच नविन नेता झालेला एकजण म्हणतो की, भुजबळ आता म्हातारे झाले. आरे होय माझे केस आता पांढरे झाले. तुमच्याही घरातील तुमचे आई-वडील यांचेही केस पांढरे झाले असतील ते ही म्हातारे झाले असतील. सगळेच म्हातारे होतात. मी हे केस उगाच पांढरे झाले नाहीत. पण या मा डोक्यावर जितके केस असतील त्यापेक्षा अधिक ओबीसी आंदोलने केली. अजूनही आंदोलने करण्याची तयारी या छगन भुजबळ मध्ये आहे असा निर्वाणीचा इशाराही दिला.
यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, आमची लायकी काढता, ज्या शिवछत्रपतींची पहिल्यांदा समाधी शोधली ती महात्मा फुले यांनी, तसेच शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिला तो महात्मा फुले यांनी आणि त्यानंतर शाहिर अमर शेख आणि त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांनी. तसेच ज्या संविधानामुळे आम्हाला जगण्याचं बळ ते संविधान लिहिणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर हे दलित समाजातील होते. मग यांची लायकी नव्हती का असा सवाल मनोज जरांगे पाटील यांचे नाव घेता करत छत्रपती शिवाजी महाराज यांचेसोबत रामोशी, बेरड, दलित, मागास, आदी सगळे होते याची आठवणही करून दिली.