Breaking News

भ्रष्ट पीएंना मारहाण, उद्या हीच वेळ मंत्र्यांवरही ओढवेल! विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सरकारवर टीकास्त्र

मुंबई : प्रतिनिधी

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या स्वीय सहाय्यकाने १० लाख रूपये घेऊन काम न केल्यामुळे त्याची मंत्र्यांच्याच दालनात झालेल्या यथेच्छ ‘धुलाई’वरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर जोरदार निशाना साधला आहे. आज भ्रष्ट पीएंना मारहाण होते, अशीच परिस्थिती राहिल्यास हीच वेळ उद्या मंत्र्यांवरही ओढवू शकते, असा इशाराच त्यांनी सरकारला दिला.

या घटनेवरून घणाघात करताना विखे पाटील म्हणाले की, या सरकारमध्ये आता लोक मंत्रालयात घुसून मंत्र्यांच्याच दालनात त्यांच्या अधिकाऱ्यांना मारहाण करू लागले आहेत. या सरकारने पारदर्शक कारभाराचे आश्वासन दिले होते आणि मंत्रालयात नेमका कसा कारभार सुरू आहे, ते आता अगदी ‘पारदर्शक’ पद्धतीने समोर आले आहे. पैसे घेऊन काम झाले नाही म्हणून चक्क मंत्र्यांच्या दालनात हाणामारी होण्याचा एक आगळावेगळा ‘पराक्रम’ भाजप-शिवसेना सरकारच्या नावे नोंदला गेला आहे.

खरे तर ही घटना अत्यंत निषेधार्ह आहे. राज्य सरकारला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या घटनेसाठी राज्य सरकारची भ्रष्टाचाराप्रती उदासीन व मवाळ भूमिका कारणीभूत आहे. राज्यातील निम्म्याहून अधिक मंत्र्यांवर ठोस पुराव्यांसह भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलटपक्षी त्यांना अभय देण्याचेच उघड प्रयत्न झाले. त्यामुळे हे सरकार भ्रष्टाचाराविरूद्ध कोणतीही कारवाई करू शकत नाही, असा स्पष्ट संदेश सर्वत्र गेला असून, मंत्री तर मंत्री पण त्यांचे अधिकारीही आता खुलेआम भ्रष्टाचार करताना दिसत आहेत. त्याचा परिणाम म्हणून आता पैसे देऊन काम न झालेली मंडळी दिवसाढवळ्या मंत्रालयात घुसून अधिकाऱ्यांना मारहाण करू लागली आहेत. हीच वेळ उद्या मंत्र्यांवर आली तरी फारसे आश्चर्य वाटणार नाही. ही या सरकारच्या कर्माची फळे असतील, अशी बोचरी टीका विखे पाटील यांनी केली.

या घटनेने सरकारची अक्षरशः बेअब्रू झाली आहे. भ्रष्टाचाराबाबत सरकारलाच गांभीर्य राहिलेले नाही. त्यामुळे या प्रकरणात कारवाई होईल, अशी अपेक्षा बाळगणेच गैर असून, हे प्रकरण सुद्धा दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाईल. मात्र सरकारकडे किमान मनाची शिल्लक असेल तर आता ‘क्लीन चीट योजना’ बंद करावी आणि १० लाख रूपयांच्या लाचखोरीच्या या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी, असे विरोधी पक्षनेते पुढे म्हणाले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *