राज्यातील बहुतांश वर्तमान पत्रांमध्ये आज मंगळवारी १३ जून रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षा मुख्यमंत्री म्हणून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अधिक पसंती असल्याची भली मोठी जाहिरात पाहून भाजपामधील अनेक नेत्यांना धक्का बसला. त्यातच ही पसंतीची आकडेवारी एका सर्व्हेद्वारे मिळाली असल्याचा दावाही या जाहिरातीमध्ये करण्यात आली. मात्र या जाहिरातीच्या माध्यमातून करण्यात आलेला दाव्याबाबत मंत्री शंभूराज देसाई यांना विचारणा करण्यात आली असता ते म्हणाले, तो देणारा अज्ञानी…अज्ञात आहे. शिंदे साहेबांचे (शिवसैनिक) चाहत्यांपैकी एकाने ही जाहिरात दिली असल्याची शक्यता व्यक्त केली. मात्र तो जाहिरातदार कोण याचा शोध घ्यावा लागेल असे सांगत या जाहिरातीपासून हात झटकण्याचा प्रयत्न केला.
ही जाहिरात एका सर्व्हेची आहे. ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ या मथळ्याखाली ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या जाहिरातीत शिंदे गटाने आगामी निवडणुकीसंदर्भातला एक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय नेते आहेत असा दावा करण्यात आला आहे. या जाहिरातीवरून राज्यातलं राजकारण तापू लागलं आहे. या जाहिरातीवर तसेच शिंदे गटाचे खासदार गजानर कीर्तिकर यांच्या वक्तव्यावर एका भाजपा नेत्याने नाराजी व्यक्त केली.
खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले, एकनाथ शिंदे आणि ४० आमदार आले म्हणून भाजपाची सत्ता आली. जाहिरात आणि कीर्तिकरांच्या वक्तव्यावर उत्तर देताना भाजपा नेते आणि आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, अशा प्रकारच्या जाहिराती योग्य नाहीत. लोकप्रिय नेता कोणीही असो, एकनाथ शिंदे असो अथवा देवेंद्र फडणवीस असो दोघांनी मिळून महाराष्ट्राला दिशा द्यायची आहे. एकमेकांना कमी जास्त दाखवण्यासाठी कुणी खतपाणी घालत असेल तर त्याला बळी पडू नये. त्यामुळे वातावरण कलुषित होईल. मुळात दोन्ही पक्ष एकत्र आले म्हणून सत्ता आली. एका हाताने टाळी वाजत नसते. तसेच ताकद ही आपापसात आजमावण्यापेक्षा विरोधकांनी आपल्या ताकदीचा धसका घेतला पाहिजे. कुठल्याही वक्तव्यातून युतीत दुरावा किंवा तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. शिवाय भाजपाकडे तिप्पट आमदार आहेत. भाजपाने त्याग केला, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री राहिले, जास्त आमदार असूनही ते उपमुख्यमंत्रीपदी बसले त्याचं मूल्यमापन करणार आहात की नाही? असा सवालही केला.
दरेकर यांच्या वक्तव्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देसाई म्हणाले, मी आत्ताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो, प्रवीण दरेकर यांच्याशी देखील बोलेन. आमच्यात बिलकूल बेबनाव नाही. एखाद्या जाहिरातीमुळे कदाचित गैरसमज पसरले असतील तर ते गैरसमज आम्ही एकत्र बसून चर्चा करून दूर करू. ज्यांना आमच्यात भांडणं लावायचा उद्योग करायचा आहे त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी आमच्यात भांडणं लागणार नाहीत. शिंदे फडणवीस हातात हात घालून काम करत आहेत. आमच्यात कुठल्याही प्रकारचा बेबनाव आणि धुसफूस नाही.
दरम्यान, आज जाहिरात प्रसिध्द होणे आणि आजच राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणे हा काही योगायोग नाही. त्यातच या जाहिरातीवरून मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाच्या आमदारांचा वर्ग घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच युतीत फाटाफूट होईल असे कोणतेही वक्तव्य प्रसारमाध्यमांसमोर करू नका अशी समजही शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्र्यांना दिल्याची चर्चा मंत्रालयात सुरु आहे.