Breaking News

जयंत पाटील यांचा उपरोधिक सवाल, जून महिन्यातील अधिवेशनात काही मांडणार नाही का?

अंतरीम बजेट हा चार महिन्यांसाठी असतो मात्र त्याचे सरकारने पालन केलेले नाही. जून महिन्यातील अधिवेशनात काही मांडणार नाही का? याचा खुलासा व्हायला व्हावा. भाषणाची संधी म्हणून अर्थसंकल्पाचा वापर होत आहे. आर्थिक शिस्त पाळली की नाही? याची शंका वाटते. सरकारने मागचा अर्थसंकल्प तुटीचा मांडला व पुरवणी मागण्या मांडल्या. १६ हजार कोटी वजा असताना नवे १ लाख कोटींचे आश्वासने राज्य सरकारने दिले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सध्या सुरु असून नुकतेच अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यावरील चर्चेत भाग घेताना जयंत पाटील यांनी टीका केली.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले, तूट वाढवणाऱ्या प्रोव्हीजन्स या अर्थसंकल्पात आहेत का? महाराष्ट्राचे कर्ज आता आपण ८ लाख कोटी रुपयांपर्यंत नेऊन पोचवला आहात ते फेडणार कसे? १ ट्रिलीयन डॉलर जर इकोनॉमी करायची असेल तर ग्रोथ रेट १४ टक्के असायला हवी. अर्थसंकल्पात अनेक घोषणा आहेत, मागच्या किती योजना राबवल्या गेल्या त्याचा उल्लेख या अर्थसंकल्पीय भाषणात यायला हवा होता. दुष्काळ वाढतोय, कांद्याला भाव नाही, दुधाला रास्त भाव नाही, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही, त्यामुळे ते सरकारवर प्रचंड नाराज आहेत. हायवे बांधण्यापलीकडे सरकारचे सामान्य माणसाकडे लक्ष नाही असा आरोपही यावेळी केला.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांपुढे जगायचे कसे? हा प्रश्न आहे. कापसाला, सोयाबीनला भाव नाही, सरकारने खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी केंद्राकडे मागणी देखील केलेली नाही. शेतकरी आत्महत्यामुक्त राज्य करणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते पण आज रोज ८ शेतकरी आत्महत्या करत आहेत. एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र नंबर एकवर आला आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? हे म्हणायची वेळ आता आली आहे, असा उपरोधिक सवालही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.

शासन आपल्या दारीवर प्रचंड खर्च होत आहे व शेतकरी सावकाराच्या दारी जात आहे. शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून आपण त्याला दिवसाला १७ रुपये देतो, त्याला शेतीमालाची आधारभूत किंमत वाढवण्याची गरज आहे. पीक विमा शेतकऱ्यांना अजून मिळालेला नाही, त्यात अटी व शर्ती खुप असल्यामुळे एकही रुपया मिळत नाही. एक रुपयात विमा काढून सरकार हजारो कोटी कंपन्यांच्या घशात घालत आहे. सरकार नोकर भरती करत नाही केले तर पेपर फुटतो पारदर्शकपणे काम सुरु आहे असे एकही उदाहरण दिसत नाही. रोजगारासाठी तरुणांची भटकंती वाढलेली आहे, तरुण आत्महत्या करत आहेत. एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार गेल्या दोन वर्षांत सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, अर्थमंत्र्यांनी संपूर्ण भाषणात कुठेही शाहू – फुले – आंबेडकर यांचे नाव घेतलेले नाही, हि चिंतेची बाब आहे. योजनांच्या नावांपलीकडे कुठेही उल्लेख नव्हता. विचार सोडून जर विकास होत असेल तर त्याला फारसा अर्थ नाही. तरुणांच्या हाताला काम कसं देणार याचाही यात उल्लेख नव्हता. बुलेट ट्रेनचा फायदा अहमदाबाद व गुजरातला होणार हे जगजाहीर आहे तरी आपण सहन करतोय. कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी सरकारने एक चकार शब्द काढला नाही, शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार गंभीर आहे हे या बजेटमधून कुठेच दिसत नाही. रुग्णवाहिकेसाठी १०८ ची योजना सुरु असताना नवी योजना कशासाठी? या सर्व गोष्टी आपण कुठेतरी दुर्लक्षित करत आहोत. वाढवण बंदर करत असताना स्थानिकांना विश्वासात घेऊन करा. विकासाला काही धोरण व काही तत्व असले पाहिजे अशी भूमिका यावेळी मांडली.

यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी राज्याच्या सद्यस्थितीवर भाष्य करणारी कविता विधानसभेत सादर केली. ती कविता खालीलप्रमाणे…

हाताला काम नाही, सुशिक्षितांना रोजगार नाही
दुष्काळ, अतिवृष्टीच्या चकरात ग्रासला शेतकरी

पोटापाण्यासाठी वणवण सारी,
आपल्याला काय फक्त बोलून निघून जाण्याची घाई..!

आरोग्य यंत्रणा ढिसाळ झाली,
रुग्णांच्या जीवाला किंमत नाही.

मायेच्या अश्रूची थट्टा झाली, गरिबांना कोण वाली?
आपल्याला काय फक्त बोलून निघून जाण्याची घाई..!

इथे दिवसा ढवळ्या महिला सुरक्षित नाहीत, किड्या मुंग्यांसारखे त्यांचे जगणे बाई,

धर्माधर्मातील तिढा सुटेना काही, आगीत तेल ओतायला आहेत काही भाई, आपल्याला काय फक्त बोलून निघून जाण्याची घाई..!
वाढत चालली घोटाळ्यांची मांदीयाळी,

दिल्लीच्या वरदहस्ताने भाजली जाते पोळी,

साम- दाम- दंड भेद हिच विचारांची जुळी, चिरडून टाकूया आंदोलकांच्या टोळ्या, आपल्याला काय फक्त बोलून निघून जाण्याची घाई..!

राज्य सरकारकडून सादर झालेल्या अर्थसंकल्पावर जयंत पाटील यांनी विधानसभेत आपले मत व्यक्त केले.

Check Also

नाना पटोले यांचा इशारा, सांगली काँग्रेसला द्रष्ट लावणाऱ्यांची द्रष्ट उतरवल्याशिवाय…

लोकसभेच्या जागा वाटपात सांगलीच्या जागेवर दिल्लीपर्यंत चर्चा झाली, सोनिया गांधी यांनीही यावर चर्चा केली. सांगली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *