Breaking News

लाठीचार्जवरून विरोधकांचा फडणवीसांवर, तर भाजपाचा उद्धव ठाकरें आडून पलटवार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या काळातील घटना

आळंदीत वारकऱ्यांवर लाठीमार झाल्याचा आरोप होतो आहे. त्यावरुन विरोधक सरकारवर तुटून पडले आहेत. या आरोपावरून सत्ताधाऱ्यांकडून आता असा प्रकार घडलेला नाही. विरोधक राजकारण करत आहेत, खरंतर अशा गोष्टींचं राजकारण करायचं नसतं तरीही ते केलं जातं आहे असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सगळ्या प्रकरणी प्रतिक्रिया देत सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. तसेच उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा यापेक्षा भयंकर घटना घडली होती असे सांगत विरोधकांना मागे रेटण्याचा प्रयत्न केला.

यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होते तेव्हा भयंकर घटना घडली होती. चेंगराचेंगरीचे प्रकारही झाले होते. असे प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून सरकारने व्यवस्था उभी केली. याविषयीची संपूर्ण माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांना आणि जनतेला दिली. सरकारकडून त्यांनी आवाहनही केलं की विरोधी पक्षाने राजकारण करु नये. कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जी घटना घडली तेव्हा आम्हीही राजकारण केलं नाही. उलट मदत कशी पोहचवता येईल यावरच भर दिला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस काही गोष्टी आक्रमकपणे बोलताना दिसत आहेत. मात्र सरकारने आवाहन केलं आहे तर ते स्वीकारलं पाहिजे. हा विषय राजकारणाचा नाही असेही सांगितले.

तसेच शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या वगळण्याच्या मुद्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, भाजपाचा मी ३२ वर्षांपासून कार्यकर्ता आहे. कुणाच्या अधिकारात हस्तक्षेप केला जात नाही. कुणाला मंत्री ठेवायचं किंवा कुणाला नाही हा संपूर्णपणे एकनाथ शिंदेंचा अधिकार आहे. आमचं युतीचं सरकार आहे. भाजपात कोण मंत्री व्हावं हे भाजपा ठरवतं. एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्र्यांविषयी ठरवतील. आमच्यात काहीतरी भांडण लागावं म्हणून अशा पुड्या सोडल्या जात आहेत असा दावाही केला.

संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराच्या समोर काही तरुण मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना अडवताना पोलिसांनी सौम्य लाठीमार केला होता. मात्र तो लाठीमार झालेला नाही, किरकोळ झटापट झाल्याचा खुलासा पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केला होता. तर विरोधी पक्षांनी या घटनेवरुन राज्य सरकारवर सडकून टीका केली होती. असं असतांना रविवारचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे या सर्व वादाला आणखी वेगळे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण

मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण दिले आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *