Breaking News

शरद पवार यांचा आरोप, विरोधातील बातम्यांवर लक्ष ठेवले जाते…फोन केला जातो काही सहकारी तुरुंगात गेले पण पक्ष बदलला नाही

सध्या जे सत्तेत आहेत त्यांच्या कार्यालयात गेले तर त्यांच्या कार्यालयात विविध भाषेतील वृत्त वाहिन्या लावलेल्या असतात. जी भाषा कळत नाही त्या वृत्तवाहिनीवरील बातम्यांवरही लक्ष ठेवले जाते आणि ती बातमी जर सरकार विरोधी असेल तर संबधितांना फोन करून परत होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदी सरकारवर केला.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी आपल्या गटाची आणि समर्थकांची बाजू मांडण्यासाठी पुणे येथे जाहिर सभा घेतली. त्यावेळी शरद पवार यांनी भाजपावर आणि नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता आरोप केला.

पुढे शरद पवार बोलताना म्हणाले, ईडी या सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून काही राजकिय पक्षांवर सत्ताधाऱ्यांच्या पक्षात यावे म्हणून दबाव आणला जातो. या दबावापुढे काही जण झुकून काही जण त्यांच्यासोबत जात आहेत. मात्र आमचे सहकारी अनिल देशमुख यांना जवळ बोलावत १४ महिने तुरुंगात गेले. पण पक्ष बदलला नाही. त्याचबरोबर सामना या वर्तमानपत्राचे संपादक संजय राऊत हे तीन महिने तुंरुगात होते. मात्र त्यांनी एकनिष्ठ रहात त्यांच्या पक्षासोबत राहिले. याशिवाय समाज माध्यमातून अनेकांच्या विरोधात बदनामी केली जाते. जर कोणी सोशल मिडियात असेल आणि त्याच्यावर विनाकारण बदनामी केली जात असेल त्यांच्या मागे आमच्या पक्षाची यंत्रणा त्या व्यक्तीच्या पाठिशी राहणार असल्याचेही स्पष्ट केले.

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करताना म्हणाले, देशाचे पंतप्रधान उत्तर प्रदेशातील वाराणसी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्या वाराणसीत लाल बहादूर शास्त्री सारख्या महान व्यक्तींनी महात्मा गांधी यांच्या विचाराच्या एका संघटनेला जमिन दिली होती. ती रितसर रेल्वेकडून विकत घेतली होती. मात्र आता केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाने क्षणात त्या जागेवर मालकी सांगत तेथील सर्व गोष्टी उध्दवस्त केल्या. ही त्यांची क्रिया ही सरकारी यंत्रणेचा आणि सत्तेचा दुरूपयोग करण्याचा प्रकार असल्याची टीकाही केली.

तसेच शरद पवार म्हणाले, पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीच्या मतदारसंघात असे सत्तेचा गैरवापर होत आहे. यावरून सत्तेचा गैरवापर करण्याकडे यांचा कल वाढला आहे. तसेच दूरचित्रवाहिन्यांच्या माध्यमातून तुमचे मत तयार करण्याचा प्रयत्न सध्या सुरु असल्यानेच सरकारच्या विरोधातील बातम्या येऊ दिल्या जात नसल्याचा आरोप केला.

शरद पवार म्हणाले, आमच्यासोबतचे काही सहकारी त्यांच्यासोबत गेले. जे गेले त्यांच्या विरोधात ईडीकडे तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. त्या माध्यमातून त्यांच्यावर दबाव आणत त्यांना तिकडे घेऊन गेले. त्यातील जे भेकड होते ते सर्वजण सत्तेवर असणाऱ्या पक्षाच्या मांडीवर जाऊन बसल्याची टीका अजित पवार गटावर नाव न घेता केली.

पण जो जो व्यक्ती सत्तेचा गैरवापर करणाऱ्या सरकारच्या आणि पक्षाच्या विरोधात लढण्यासाठी इंडिया या विरोधकांसोबत येईल त्याच्या पाठिशी आमची यंत्रणा उभी राहिल अशी ग्वाहीही शरद पवार यांनी यावेळी दिली.

Check Also

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रासाठी मागितल्या या गोष्टी, पण पंतप्रधान मोदींकडून साधा उल्लेखही नाही

स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यानुसार काँग्रेस विसर्जित झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *