Breaking News

भाजपाची उद्धव ठाकरेंवर टीका,… तोंडी मुस्लिम लीगची भाषा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समान नागरी कायद्यामुळे हिंदूंना त्रास होणार असल्याचे सांगितले असून त्यांचे हे वक्तव्य घटनासमितीत समान नागरी कायद्याच्या मार्गदर्शक तत्त्वाला विरोध करणाऱ्या मुस्लिम लीगच्या नेत्याप्रमाणेच आहे. देशहिताच्या महत्त्वाच्या विषयावर मुस्लिम लीगची भाषा बोलणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आता तरी आपण हिंदुत्व सोडले नाही असे सांगू नये, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी सोमवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केले.

भाजपाचे प्रदेश सहप्रवक्ते विश्वास पाठक म्हणाले की, शिल्लक सेनेच्या शिबिरात भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी समान नागरी कायद्यामुळे हिंदूंना किती त्रास होणार आहे ते सांगा, असे आवाहन केले. सरकारने समान नागरी कायदा करावा असे मार्गदर्शक तत्त्व देशाच्या संविधानात समाविष्ट केले गेले. त्यावेळी घटना समितीच्या बैठकीत अनेक मुस्लिम सदस्यांनी त्याला जोरदार विरोध केला होता. त्यापैकी एकजण असलेले मुस्लिम लीगचे मद्रासचे सदस्य बी. पोकर साहेब यांनी या तरतुदीला विरोध करताना हिंदू धर्मियांचा मुद्दा मांडला होता. समान नागरी कायद्यामुळे होणारा हस्तक्षेप जुलमी आहे अशी हिंदूंची निवेदने आपल्याकडे आली तसेच हिंदू समाजातील अनेक घटक याच्या विरोधात बंड करत आहेत, असे त्या मुस्लिम सदस्याने सांगितले होते. उद्धव ठाकरे यांनीही समान नागरी कायद्यामुळे हिंदूंना त्रास होईल हा लावलेला शोध मुस्लिम लीगच्या भूमिकेसारखाच आहे.

विश्वास पाठक म्हणाले की, समान नागरी कायद्याबाबात मुस्लिम लीगप्रमाणे भूमिका मांडणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी याबाबत घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही भूमिका समजून घ्यायला हवी. समान नागरी कायद्याबाबतची तरतूद प्रभावहीन करण्यासाठी घटना समितीत सुधारणा मांडण्यात आल्या होत्या. त्यावर दि. २३ नोव्हेंबर १९४८ रोजी चर्चा झाली होती. या चर्चेत भाग घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुस्लिम सदस्यांनी मांडलेले आक्षेप मुद्देसूदपणे खोडून काढले होते आणि समान नागरी कायद्याच्या तरतुदीचे समर्थन केले होते. घटना समितीच्या कामकाजाच्या नोंदीत याचा उल्लेख आहे व तो सर्वांना पाहण्यास उपलब्ध आहे.

ते म्हणाले की, मुंबई महापालिका निवडणुकीत वीस टक्के मतांच्या गठ्ठ्यासाठी समान नागरी कायद्याबद्दल अपप्रचार करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी थेट मुस्लिम लीगच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. त्यामुळे आता तरी आपण हिंदुत्व सोडले नाही असे सांगणे त्यांनी बंद केले पाहिजे असा उपरोधिक टोलाही लगावला.

Check Also

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रासाठी मागितल्या या गोष्टी, पण पंतप्रधान मोदींकडून साधा उल्लेखही नाही

स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यानुसार काँग्रेस विसर्जित झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *