Breaking News

फडणवीस म्हणाले, “पोलिस मस्तवाल होतील”, तर गृहमंत्री म्हणाले “चौकशी होईल” भाजपा आमदार रवि राणावरील गुन्ह्या प्रकरणी विधानसभेत गोंधळ

भाजपा समर्थक आमदार रवी राणा यांच्या विरोधात पोलिसांनी गंभीर दाखल केले. परंतु त्यावेळी ते दिल्लीत होते. तरीही त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. जर आमदारांवर अशा पध्दतीचे पोलिसांकडून गुन्हे दाखल होत असतील तर त्या विषयीची दाद कोणाकडे मागायची असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत रवि राणा यांना सभागृहात बोलू द्यावे अशी मागणी केली.

त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी रवि राणा यांना बोलण्याची संधी दिली. यावेळी रवि राणा म्हणाले की, मी रेल्वेच्या मिटींगसाठी दिल्लीत होतो. त्यावेळी माझ्यावर ३०७ चा गुन्हादाखल करण्यात आला. मी घरी नसताना १००-१५० पोलिस माझ्या घरी गेले, घरी माझ्या वयोवृध्द आईला घराच्या बाहेर काढून घराची झडती घेतली. मी आल्यानंतर याबाबत चौकशी केली तर माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्याचा आरोप करत यासंदर्भातील पुरावेही माझ्याकडे असल्याचे सांगत मला आज स्वर्गिय गृहमंत्री आर.आर.पाटील यांची आठवण होत आहे.

रवि राणा यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप घेत म्हणाले की, रवि राणा यांनी मंत्री महोदयांचे नाव घेवून बोलताना नोटीस दिली होती का असा सवाल केला. जर दिली नसेल तर मंत्री महोदयांचे नाव त्यांच्या वक्तव्यातून काढून टाकावे अशी मागणी केली.

त्यावर विरोधी पक्षनेते फडणवीस लगेच बोलण्यास उठून उभे रहात म्हणाले की, नावांचा विषय बाजूला ठेवा, पण एका लोकप्रतिनिधीबरोबर पोलिस अशा पध्दतीची कारवाई करतात याचा अर्थ काय, राज्यातील पोलिस यंत्रणा कोलमडून पडली असून आज तुमचे सरकार आहे. पण पोलिस मस्तवाल होत आहेत. त्यांना आताच आवर घालावा लागेल. अन्यथा उद्या ते मनमानी पध्दतीने वागतील कोणावरही गुन्हे दाखल करतील अशी भीती व्यक्त केली.

त्यावर विधानसभा अध्यक्ष झिरवळ यांनी सरकारने यात लक्ष घालावे असे आदेश दिले. तरीही भाजपाच्या सदस्यांचे समाधान झाले नसल्याने त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत गोंधळास सुरुवात केली. तरी अध्यक्ष झिरवळ यांनी विरोधकांच्या गोंधळाकडे लक्ष न देता पुढील कामकाज पुकारले. काही वेळ घोषणा दिल्यानंतर कामकाज तसे पुढे सुरु राहिल्याने अखेर फडणवीस यांनीच सरकारकडून आम्हाला आश्वासन मिळणार आहे की नाही असा सवाल करत आम्हाला चर्चा करायचीय गोंधळ घालायचा नसल्याचे सभागृहास सांगितले.

त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी रवि राणा यांच्या भावना समजू शकतो. रवि राणा यांनी अमरावतीत जो पुतळा बसविला त्यामुळे तेथील कायदा व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. राज्यात कोणताही पुतळा बसवायचा असेल तर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय बसविता येत नाही. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंचीही लहान होती. ती नियमानुसार नव्हती. तो पुतळा सहजपणे हाती येणारा होता. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी तो पुतळा हटविला. त्यानंतर त्या दिवशी जे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पोलिसांनी कठोर कारवाई केली. जो गुन्हा दाखल झाला तो गुन्हा का दाखल झाला याची चौकशी होणे गरजेचे आहे. राणा यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात मी गृहमंत्री म्हणून किंवा मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही स्वरूपाचे आदेश दिले नव्हते असा खुलासा केला.

यासंदर्भात राज्याचे कायदा व सुव्यवस्थेचे अतिरिक्त महासंचालक हे चौकशी करतील असे सांगत या वादावर गृहमंत्र्यांनी पडदा टाकला आणि विधानसभेचे पुढील कामकाज सुरळीत सुरु झाले.

Check Also

ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील तरूणाईशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अव्वल ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील गेमरशी संवाद साधला. मात्र यागेमर्सनी पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *