Breaking News

धर्मा पाटील यांच्या मृत्यूस सनदी अधिकारी कानडे, मंत्री रावल जबाबदार? ऊर्जा विभागातील अधिकाऱ्यांचे मात्र हातावर घडी तोंडावर बोट

मुंबईः प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यातील थर्मल पॉवर प्रोजेक्ट आणि आताच्या सोलर प्रकल्पासाठी भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी सरकार आणि प्रशासनाशी झुंज देणाऱ्या शेतकरी धर्मा पाटील यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांच्या या मृत्यूस ऊर्जा विभागाचे माजी सचिव विद्याधर कानडे आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल जबाबदार असल्याची धक्कादायक माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे थर्मल पॉवर प्रकल्प उभारण्यासाठी तेव्हाचे ऊर्जामंत्री अजित पवार यांनी ६६९ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्याचा निर्णय घेतला. तसेच या भूसंपादनाच्या बदल्यात प्रत्येक शेतकऱ्याला १० लाख रूपये नुकसान भरपाईचा निर्णय घेतला. त्यानुसार ४७० हेक्टर जमिन भूसंपादीत करण्यात आली. दरम्यानच्या काळात ऊर्जा विभागाच्या सचिव पदी नव्याने रूजू झालेले विद्याधर कानडे यांनी ऊर्जा विभागाकडून देण्यात येत असलेल्या नुकसान भरपाईला विरोध दर्शवित प्रति हेक्टर २ लाख रूपये देण्याची शिफारस करत तसा निर्णय घेण्याची सूचना स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांच्या या निर्णयामुळेच राज्य सरकारने भूसंपादनाच्या नुकसान भरपाई रकमेत घट केल्याने १९९ हेक्टर जमिनीचे भूसंपादन होवू शकले नाही. त्यातच त्यावेळी देण्यात येत असलेल्या भरपाईच्या रकमेपेक्षा जास्त रकमेची मागणी धर्मा पाटील यांच्यासह १९९ हेक्टर जमिन धारकांनी केली. मात्र ऊर्जा विभागाचे सचिव कानडे यांचा निर्णय फिरविणे शक्य न झाल्याने पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या मागणीनुसार नुकसान भरपाई देता आली. त्यातच २०१४-१५ च्या अखेरीस कानडे हे सेवानिवृत्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर धर्मा पाटील यांनी नुकसान भरपाईची रक्कम वाढवून मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही काहीच हालचाल होत नसल्याने २२ जानेवारी २०१८ रोजी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना घडलेल्या दिवशी आणि २५ जानेवारी २०१८ रोजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यात बैठक झाली. त्यावेळी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत याप्रकरणी कायदेशीर अपील करण्याची सूचना केली. हे अपील केल्यास एकट्या धर्मा पाटील यांच्यासोबतच इतर शेतकऱ्यांनाही १० लाख रूपयापर्यंतची भरपाई देण्याची तयारी दर्शविली. मात्र या दोन्ही बैठकीत पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी मला कायदा सांगू नका फक्त शेतकऱ्यांना पैसे द्या अशी ताठर भूमिका घेतली. एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याचे ऐकत नसल्याने समेटाचा मार्ग निघू शकला नाही. त्यामुळे धर्मा पाटील यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळू शकली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *