Breaking News

देवेंद्र फडणवीस यांचा सूचक इशारा, आई-बहिण काढता अन् शिवाजी महाराजांचे उदाहरण देता

राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी हा प्रश्न रखडण्यास देवेंद्र फडणवीसच जबाबदार असल्याचा आरोप करत आपला बळी घेण्यासाठी इन्कांऊटर करण्याचा किंवा सलाईनमधून विष देण्याचा डाव असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. या प्रकरणी राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली.

त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण रहात असलेला सागर बंगला हा सरकारी निवासस्थान असल्याचे सांगत सरकारी कामासाठी कोणीही सरकारी बंगल्यावर येऊ शकते असे जाहिर केले. त्यास काही तासांचा अवधी लोटत नाही, तोच अंतरावली सराटी, जालना जिल्ह्यात पोलिसांनी कर्फ्यु जारी लागू केला.

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपाचे पडसाद विधानसभेत आज उमटले. त्यावर भाजपाचे आशिष शेलार आणि काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांनी भूमिका मांडल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संपूर्ण प्रकरणाचे एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, खरं तर या विषयावर मला सभागृहात काही बोलायचे नव्हते. तसेच विधानसभा अध्यक्षांनी या वक्तव्याची चौकशी करण्यासाठी SIT गठीत करण्याबाबत आदेश दिले आहेत. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशांचे पालन केले जाईल असे स्पष्ट केले.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षण माझ्याच कार्यकाळात दिले गेले.ते हायकोर्टात टिकविले आणि मी मुख्यमंत्री असेपर्यंत सुप्रीम कोर्टात सुद्धा टिकविले. या संपूर्ण काळात सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आदी अनेक उपाय केले आणि त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात मराठा समाजाला झाला आणि आजही होतो आहे. मराठा समाजाला आरक्षण मी दिले म्हणजे या सभागृहाने दिले. त्यामुळेच संपूर्ण मराठा समाज माझ्या मागे उभा राहिला आणि आहे. त्यासाठी मला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचा सूचक इशाराही मनोज जरांगे पाटील आणि विरोधकांना नाव न घेता दिला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पण मला आई-बहिणीच्या शिव्या द्यायच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे, असे सांगत कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला शिवाजी महाराजांनी परत पाठविल्याचे उदाहरण देत म्हणाले की, हा काय प्रकार? असा सवाल करत मराठा आंदोलनाच्या काळात ज्या गोष्टीचा उल्लेख करण्यात येत आहे. विशेषतः पोलिसांनी लाठीचार्ज करण्याबाबत त्याच्या बद्दलची माहिती कुणाकडे बैठक झाली, कुणी दगडफेक करायला सांगितली, ते आता आरोपी सांगत आहेत. या संपूर्ण प्रकारात बीडच्या घटना कशा विसरता येतील? तुम्ही राजकारण कुठल्या स्तराला घेऊन निघाले आहात? कुणाचे कार्यकर्ते आहेत? कोण पैसा देते आहे? हे सारे समोर येते आहे आणि येईलच असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला जरांगे यांच्यावर काहीच बोलायचे नाही. पण त्यांचा बोलविता धनी कोण? हे शोधून काढले जाईल. छत्रपती संभाजीनगर आणि नवी मुंबईत वॉररूम कुणी सुरू केल्या, हेही तपासात पुढे येते आहे. एक नक्की हे संपूर्ण षडयंत्र पुढे आणले जाईल. तसेच काही मराठा आंदोलकांकडून अशी शिवीगाळ कुणालाही झाली, मग ते विरोधक का असेना, तर त्याच्यासोबत उभा राहणारा हा देवेंद्र फडणवीस पहिला असेल असे विधानसभेला आश्वस्त करत विरोधकांना सूचक इशाराही दिला.

Check Also

नाना पटोले यांचे टीकास्त्र, नरेंद्र मोदी फेल झालेले इंजिन…

नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात देशाला अधोगतीकडे नेले आहे. मोदींनी जनतेला दिलेले एकही आश्वासन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *