Breaking News

अतुल लोंढे यांचा आरोप, सरकारची कंत्राटी नोकर भरती ही सुशिक्षीत तरुणांचे शोषण करणारी कंत्राटी नोकर भरती थांबवा अन्यथा तरुणांच्या हितासाठी रस्त्यावर उतरु

देशाप्रमाणे राज्यातही बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड आहे. महाराष्ट्रात सध्या ३२ लाख तरुण एमपीएससी, सरळसेवा भरती व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या परिक्षांसाठी तयारी करत आहेत. सरकार आरक्षणाच्या नावाखाली एका समाजाला दुसऱ्या समाजाशी झुंजवत ठेवून कुशल व अकुशल नोकऱ्यांचे आऊटसोर्सिंग करत आहे. अशा पद्धतीची नोकर भरती ही सुशिक्षित तरुणांचे शोषण करणारी आहे, सरकारने ही कंत्राटी नोकर भऱती तात्काळ थांबवावी अन्यथा तरुणांच्या हितासाठी रस्त्यावर उतरु, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, राज्यात २.५ लाख सरकारी पदे रिक्त आहेत. तलाठी पदाच्या भरतीसाठी १४ लाख तरूणांनी अर्ज भरले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असताना राज्य सरकार जर कंत्राटी पद्धतीने नोकर भरत करत असेल तर हा सुशिक्षित तरुणांवरील अन्याय असून काँग्रेस पक्ष अशा नोकर भरतीचा निषेध करत आहे. या सुशिक्षित तरुणांना वेठबिगार करण्याचे शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे प्लॅनिंग आहे का? हे एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री, एक फुल दोन हाफ, यांनी स्पष्ट करावे. हा सर्व प्रकार पाहता सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न पडतो. राज्य सरकारने आऊटसोर्सिंग नोकर भरती बंद करावी अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी काँग्रेस पक्ष तरुणांच्या बरोबर रस्त्यावर उतरेल.

उच्च शिक्षण घेऊन सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची ही घोर फसवणूक आहे. खाजगी कंपनीच्या माध्यमातून नोकर भरती करण्याचा प्रकार हा केवळ कंत्राटदारांच्या फायद्याचा आहे. १५ -२० हजार रुपये देऊन तरुणांची बोळवण करणार व कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा हा प्रकार आहे. सरकारने ही नोकरी भरती तातडीने बंद करुन कालबद्ध आराखडा आखून २.५ लाख रिक्त पदे भरावीत, असे लोंढे म्हणाले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *