माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेस चे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकुरकर यांच्या स्नुषा डॉ अर्चना पाटील यांनी शनिवारी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, लातूरचे महायुतीचे उमेदवार भाजपा खा. सुधाकर श्रुंगारे, आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, आ. राणा जगजीतसिंह पाटील, माजी आमदार सुधाकर भालेराव, भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, विक्रांत पाटील, माधवी नाईक, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, बसवराज पाटील आदी उपस्थित होते. डॉ. अर्चना पाटील यांच्या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीला मराठवाड्यात आणखी बळ मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. याच कार्यक्रमात उदगीरचे नगराध्यक्षपद अनेक वर्षे भूषविणारे राजेश्वर निटुरे यांनीही यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉ. अर्चना पाटील आणि राजेश्वर निटुरे यांचे स्वागत केले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेली १० वर्षे पंतप्रधान मोदी ज्या प्रकारे देशाच्या विकासाला दिशा, गती देत आहेत त्याने प्रभावित होऊन डॉ. अर्चना यांनी सामाजिक क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात येण्याचा व भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रामाणिक व मूल्याधिष्ठीत राजकारण करणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज चाकुरकर यांचा समृद्ध वारसा डॉ अर्चना भाजपामध्ये काम करून पुढे नेतील, असा विश्वास आहे. अर्चना पाटील यांच्या प्रवेशामुळे लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार सुधाकर श्रुंगारे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असेही त्यांनी नमूद केले. सर्वसामान्यांसाठी कार्य करणारे, उदगीरचे ८ वेळा नगरसेवक व ७ वेळा नगराध्यक्ष राहीलेले निटुरे यांच्या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीला अनुभवी, परिपक्व नेतृत्व लाभले आहे या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी निटुरे यांचे स्वागत केले.
डॉ अर्चना पाटील म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज देशाचा विकसनशील ते विकसीत देश असा वेगवान व विलक्षण प्रवास सुरू आहे. नारी शक्ती वंदन विधेयक पारित करून मोदीजींनी महिलांचा सन्मान राखला. महिला आरक्षणाचा कायदा संमत झाल्यानंतर आपण भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला. जात, धर्म-पंथ या पलिकडे जात समाजातील शेवटच्या माणसाचा विकास हा मोदीजींचा ध्यास असून त्यांना साथ देण्याची आपली इच्छा आहे. भाजपा नेतृत्व जी जबाबदारी देईल ती सचोटीने पार पाडू असेही सांगितले.