Breaking News

कन्हैयाकुमार म्हणाले, पंतप्रधान मोदी भाषणातून बकवास करतायत कुणाल राऊत यांच्या पदग्रहण समारंभात काँग्रेस नेत्यांची मोदी सरकारवर चौफेर टीका

दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ८ वर्षांत १६ कोटी बेरोजगार युवकांची फसवणूक केली असल्याचा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी केला. २ कोटी युवकांना रोजगार तर सोडा त्यापेक्षा अधिक युवकांच्या नोकऱ्या गेल्या, त्यासाठी तुम्ही जबाबदार नाही का? असा सवाल त्यांनी मोदी सरकारला विचारला.
प्रदेश युवक काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलताना पाटील यांच्यासह विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कन्हैय्या कुमार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. वी. श्रीनिवास यांनी मोदी सरकार आणि भाजपवर चौफेर टीका केली.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार कुणाल राऊत यांनी टिळक भवन या प्रदेश काँग्रेस मुख्यालयात स्वीकारल्यानंतर त्यांच्या पदग्रहणानिमित्त कामगार कल्याण मैदानात आयोजित मेळावा पार पडला.
“डॉ. मनमोहनसिंह यांच्या काळात देशातील गरिबी, बेरोजगारी कमी झाली होती. मात्र, गेल्या ८ वर्षांत १९ कोटी युवकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यात ३० वर्षांपेक्षा कमी असलेल्या ५ कोटी युवकांचा समावेश आहे. मोदी यांनी सत्तेवर आल्यावर सर्वसामान्य नागरिकांच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. या लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले का?”देशातील गरिबांची संख्या वाढत असताना अब्जाधीशांच्या संख्येतही वाढ होत चालली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, जात, धर्माच्या नावाखाली फूट पाडून इंग्रजांनी देशाला गुलाम केले. तीच पद्धत वापरून भाजपा राजकारण करीत आहे. गरिबांना आणखी गरीब करणाऱ्या या भाजप सरकारला उखडून फेकून २०२४ मध्ये राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी बसविण्यासाठी संघर्ष करा, असे आवाहन त्यांनी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना केले.
मेळाव्याला मार्गदर्शन करताना विधिमंडळ पक्षनेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, केंद्र सरकारकडून सध्या देशात सुरू असलेले राजकारण दुर्दैवी आहे. लोकशाहीची प्रतिष्ठा जपण्याची वेळ आली आहे. महागाई, बेरोजगारी वाढली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देश चालवायचा असून नेतृत्व घडवण्याची जबाबदारी तरुणांवर आहे. त्यासाठी युवक काँग्रसने पुढाकार घेण्याची गरज आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले, देशाची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने सुरू असून त्यासाठी समतेचे वातावरण नष्ट केले जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. अर्थव्यवस्थेतील अपयश लपवण्यासाठी देशात धार्मिक द्वेष निर्माण केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. महागाई, बेरोजगारी या प्रश्नावर राज्यव्यापी आंदोलन उभारा, शिबिरे घ्या, आम्ही खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत आहोत. काँग्रेसची ताकद प्रत्येक गावात आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीपूर्वी गावागावात वातावरण तयार करा, असे आवाहन त्यांनी युवक काँग्रेसला केले.
काँग्रेस नेते कन्हैयाकुमार यावेळी म्हणाले ,भारत देश हा हेलिकॉप्टरवरून उडणाऱ्यांचा आणि सायकलवरून फिरणाऱ्यांचा देखील आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार हा देश चालेल. कोणाचीही मनमानी आम्ही चालू देणार नाही. देशाचे पंतप्रधान भाषणातून बकवास करतात. त्यामुळे मी आजकाल बोलणे बंद केले आहे. संख्याबळ महत्वाचे नाही. धैर्य आणि साहस दाखविण्याची गरज आहे. संख्याबळ महत्वाचे असते तर छत्रपती शिवाजी महाराज कधीही लढाई जिंकले नसते, असेही कन्हैयाकुमार म्हणाले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *