Breaking News

जयंत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर टोला, …फारच पोकळ आदेश शिंतोडे उडवण्याचे काम सातत्याने महाराष्ट्रात चालू आहे;त्याचा निषेध...

सरकारने संबंधित वेबसाईटवर कारवाईचे आदेश दिले असले तरी ते पोकळ वाटतात. त्यामुळे तो मजकूर तात्काळ काढून टाकण्यात यावा. आणि ज्यांनी हा मजकूर लावला त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा ही मागणी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

गेले दोन दिवस लोकसभानिहाय आढावा बैठक राष्ट्रवादी भवन येथे शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आज बैठक संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

जयंत पाटील म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा तुम्हाला महाराष्ट्र सदनात चालत नाही तो पुतळा बाजुला करण्याचे पाप तुम्ही करता आणि आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या गावातील कार्यक्रमात त्यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री करतात याबाबत जयंत पाटील यांनी आश्चर्य व्यक्त करतानाच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाची घोषणा केली, त्याबद्दल कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही असेही स्पष्ट केले.

जंयत पाटील यांनी सांगितले की, आम्ही मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र दिले होते शिवाय आज त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्या निवेदनात ज्या वेबसाईटवर असे घृणास्पद लिखाण करण्यात आले आहे. त्या संबंधित वेबसाईटवर व लेखकावर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र अद्यापही ते वृत्त त्या वेबसाईटवरून काढण्यात आलेले नाही याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

तसेच जयंत पाटील यांनी इशारा देताना म्हणाले, जसे महाराष्ट्र सदनामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवण्यात आला तसा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचाही पुतळा बाजुला हटविण्यात आला. हे महाराष्ट्र सहन करणार नाही याचा निषेध महाराष्ट्रातील जनता सतत करेल असेही म्हणाले.

सावरकर जयंती महाराष्ट्र सदनात साजरी करायला कुणाची तक्रार नव्हती. परंतु महाराष्ट्राला आणि देशाला जी व्यक्तीमत्व भूषणावह आहेत त्या महान नेत्यांचा अवमान करण्याचा कार्यक्रम गेले काही वर्षे चालू आहे. बहुजन समाजातील सगळ्या महापुरुषांना धक्का लावायचा, त्यांची प्रतिमा डागळायची, त्यांच्याविषयी चुकीचे आक्षेपार्ह लिखाण बाहेर आले तरी ते फक्त पहायचं किंबहुना ट्विटर तपासले तर काही विशिष्ट वर्गाची लोकं याला प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे अशा गोष्टी करुन महाराष्ट्रात बहुजन समाजातील महापुरुषांबद्दल चुकीची विधाने आणि त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे काम सातत्याने महाराष्ट्रात चालू आहे. त्याचा निषेध जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना केला.

Check Also

संध्या सव्वालाखे यांचा आरोप…भाजपा सरकार महिला अत्याचार रोखण्यात अपयशी

भारतीय जनता पक्ष बेटी बचाओ, बेटी पढाओ, लेक लाडकी, लाडली बहना यासारख्या योजनांचा गाजावाजा करते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *