Breaking News

डॉ प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ला करणाऱ्या हल्लेखोराची आई म्हणाली, दारूच्या नशेत केलं… सातव यांच्या कोहिनूर बंगल्यासमोर हल्लेखोर महेंद्र डोंगरदिवेच्या आईनी मांडली व्यथा

कोविड काळात काँग्रेसचे दिवंगत आमदार राजीव सातव यांच्या झालेल्या निधनानंतर पत्नी आणि विधान परिषद आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर बुधवारी रात्री हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला. प्रज्ञा सातव यांनी स्वत: या प्रकाराची माहिती दिली आहे. हिंगोलीतील कळमनुरीच्या कसबे धवंडा गावात प्रज्ञा सातव गेल्या असता हा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या घटनेवरून तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला. या पार्श्वभूमीवर आरोपीचे आई-वडील थेट प्रज्ञा सातव यांच्या कोहिनूर या निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. यावेळी आरोपी महेंद्र डोंगरदिवेच्या आईला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळाले.

प्रज्ञा सातव यांनी त्यांच्या ट्विटरवर आणि फेसबुक पोस्टमध्ये कसबे धवंडामध्ये नेमकं काय घडलं, याचा खुलासा केला. बुधवारी डॉ. सातव या दिनक्रमानुसार कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथे गेल्या होत्या. रात्री त्या गावात पोहोचल्या तेव्हा कारमधून उतरत असतांना एक व्यक्ती त्यांच्या वाहनाच्या दरवाजा जवळच येऊन उभा राहिला. त्यामुळे आमदार डॉ. सातव वाहनाच्या खाली उतरल्याच नाही. त्यानंतर गावकरी आल्यानंतर त्या वाहनाच्या खाली उतरल्या अन त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर गावकऱ्यांना मार्गदर्शन करीत असतांना तो व्यक्ती त्यांच्या पाठीमागून आला अन अचानक त्यांना बाजूला ओढून चापट मारली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे आमदार डॉ. सातव तसेच इतर गावकरीही गोंधळून गेले.

एकीकडे प्रज्ञा सातव यांच्यावरील या हल्ल्याचा विरोधी पक्षांकडून आणि अनेक नेतेमंडळींकडून निषेध केला जात असताना दुसरीकडे प्रज्ञा सातव यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी आरोपी महेंद्र डोंगरदिवेचे आई-वडील पोहोचले. महेंद्र कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, असं म्हणताना महेंद्रच्या आईला अश्रू अनावर झाले. त्याला माफी द्यावी, अशी मागणी त्यांनी वारंवार केली.

ताईंकडे आम्ही मागणी करायला आलोय. माफ करा म्हणतोय. आम्ही माफी मागतो. त्याची लहान लहान मुलं घरी रडतायत. त्यानं केलं ते खूप चुकीचं आहे. याआधी त्यानं असं कधीच काही केलं नाही. आमचा मुलगा काही कमवत नाही. आम्ही त्याला खूप बोललो. पण आम्हाला एकदा माफ करा. या वेळी एकदा क्षमा करा, असं महेंद्रची आई वारंवार म्हणत असल्याचं दिसून आलं.

हल्ला करणारा महेंद्र डोंगरदिवे शेळ्या वळण्याचं काम करत असल्याची माहिती त्याच्या आईकडून समोर आली आहे. “आमचा मुलगा काहीच काम करत नाही. शेळ्या वळून, काम करून आम्ही घर चालवतो. आम्हाला अशी वेळ कधी आली नव्हती. आम्ही मान्य करतो की त्यानं चूक केली. ताईंच्या पाया पडतो आम्ही. माझ्या लेकराला यावेळी माफ करा. त्यानं नशेत हे केलं, पण ताईंनी त्याला यावेळी माफ करावं. दोन-तीन दिवसांपासून घरात कुणी जेवलं नाही. त्याची मुलं लहान लहान आहेत. आमची सून भातशेतावर कामाला जाते, अशा शब्दांत महेंद्रच्या आईने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

तो दारू पिऊन आला की, तसं करतो म्हणायला लागला. मी त्याला म्हटलं ते लोक असं करतात, तुला काय देणं-घेणं आहे. इतके दिवस आली नाही, ही सातव बाई आत्ता आली एवढंच मी ऐकलं, असंही महेंद्रच्या आईने माध्यमांना सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *