Breaking News

राज ठाकरे यांचा सवाल, अमेरिकेत मराठी शाळा सुरु तर महाराष्ट्रात बंद…

मराठी भाषा आणि मराठी माणूस ह्यासाठी मी आणि माझ्या पक्षाने अनेक आंदोलनं केली, मी जेलमध्ये गेलो, अंगावर केसेस घेतल्या. मी अत्यंत कडवट मराठी आहे आणि माझ्यावरचे संस्कार पण तसेच आहेत. महाराष्ट्र ही काय ताकद आहे हे जसं जसं मला समजत गेलं तसं तसं मी महाराष्ट्राच्या प्रेमात अधिक पडत गेलो अशी जाहिर कबुली मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिली.

नवी मुंबईतील विश्व मराठी समेंलन आयोजित कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे हे बोलत होते.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ह्या जूनमध्ये मला अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाने त्यांच्या संमेलनाला आमंत्रित केलं आहे. ह्या संमेलनाचे अध्यक्ष मला भेटले. ते मला म्हणाले की अमेरिकेत आम्ही शंभरहून अधिक मराठी शाळा काढल्या आहेत. महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद होत असताना, अमेरिकेत मराठी शाळा सुरु होणं हे काय कमी आहे का? असा सवालही उपस्थित केला.

तसेच राज ठाकरे म्हणाले की, पण सध्या आपण महाराष्ट्राकडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. महाराष्ट्राबाहेर आणि देशाबाहेर असलेल्या मराठी लोकांनी मराठीची, महाराष्ट्राची श्रीमंती जरूर इतर लोकांपर्यंत पोहचवली पाहिजे. पण आपल्याच महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये जेंव्हा मराठीची उपेक्षा होते, जेंव्हा तिकडे सर्रास हिंदी कानावर पडते, तेंव्हा मात्र त्रास होतो. माझा भाषेला विरोध नाही. पण हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. हिंदी ही देशातल्या इतर भाषांसारखीच एक भाषा आहे. ह्या देशात राष्ट्रभाषेचा निवाडा कधीच झाला नाही. केंद्र आणि राज्य सरकार ह्यांच्यातील व्यवहारासाठी हिंदी आणि इंग्रजी ह्या भाषा वापरल्या जातात इतकंच. बाकी हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही. पण जेंव्हा मी हे १५,२० वर्षांपूर्वी बोललो तेंव्हा माझ्या अंगावर सगळे धावून गेले. जेंव्हा ते अंगावर आले तेंव्हा त्यांना मी गुजरात हायकोर्टाचा निर्णय दाखविल्याचेही सांगितले.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मराठी लोकंच एकमेकांशी बोलताना हिंदी का वापरतात हे मला कळत नाहीये. आणि आपलीच मराठी भाषा जेंव्हा राजकीय दृष्ट्या दुय्यम लेखण्याचा प्रयत्न जेंव्हा होतो तेंव्हा माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते असा त्रागाही व्यक्त केला.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, माझी दीपक केसरकारांना विनंती आहे की ह्या राज्यातील सगळ्या शाळांमध्ये मग त्या कुठल्याही असोत तिकडे पहिली ते दहावी मराठी भाषा सक्तीची करा. सध्या सीबीएएससी, आयसीएस्सी शाळांमध्ये ज्या राज्यात राहताय तिथली भाषा शिकवायची आणि शिकायची सोडून परदेशी भाषा का शिकवताय? परदेशी भाषा हव्या तितक्या शिका पण त्याच वेळेस मराठी पण शिकलीच पाहिजे, बोलता आलीच पाहिजे अशी आग्रही भूमिकाही मांडली.

पंतप्रधान मोदी यांच्या गुजरात प्रेमाद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ह्या देशाच्या पंतप्रधानांना जर त्यांच्या राज्याबद्दल, त्यांच्या भाषेबद्दल प्रेम वाटतं. गिफ्ट सिटी असो की हिऱ्यांचा व्यापार जर गुजरातमध्ये न्यावीशी वाटते किंवा स्टॅच्यू ऑफ युनिटी पेक्षा मोठा पुतळा गुजरातमध्ये उभारावासा वाटतो, थोडक्यात काय जर त्यांना त्यांच्या राज्याबद्दलचं आणि भाषेबद्दलचं प्रेम लपवता येत नसेल तर आपण का लवपतोय, का मागे राहतोय ? असा सवाल उपस्थित करत जेंव्हा महाराष्ट्रात मराठी माणसाला जैन माणूस घर नाकारतो तेंव्हा काय करायचं? हे गुजरात, तामिळनाडू, आसाम, केरळ ह्या राज्यात करून दाखवा. पैसे असून सुद्धा मराठी माणसाला घर नाकारायची हिंमत होते कारण आमच्या सरकारांचं बोटचेपं धोरण अशी उपहास्तमक टीकाही शिंदे सरकारवर केली.

राज ठाकरे यांनी पुढे बोलताना म्हणाले, मराठी माणसाकडे पैसे असताना त्याला घर नाकारलं जात असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा देत पुढे बोलताना म्हणाले की, आणि मराठी माणसाकडे कुठे आहे पैसा असं म्हणणारे गल्लीच्या बाहेर पण गेलेले नाहीत. त्यांना काय माहिती की महाराष्ट्रभर मराठी लोकांनी किती अफाट कर्तृत्व दाखवून पैसा उभा केलाय असे ठणकावूनही सांगितले.

मराठी भाषिकांना आवाहन करताना राज ठाकरे म्हणाले की, भाषा मेली तर सगळंच संपलं हे विसरू नका. तुमची ओळखच तुम्ही कोणते भाषिक आहात ह्यातून होते. मराठी बोलणाऱ्यांची संख्या जर बघितली तर आपण जगात दहाव्या क्रमांकावर आहोत. थोडक्यात जगातील मोठी लोकसंख्या मराठी बोलणारी आहे. पण आम्ही आमच्याच राज्यात दुसऱ्या भाषेमध्ये गोट्यांसारखे घरंगळत का जातो. माझी आज तुम्हाला एकच विनंती आहे की तुमच्या समोर कोणीही येऊ दे त्याच्याशी मराठीतच बोला असे आवाहनही केले.

Check Also

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातातील मृतांना ५ लाखांची मदत जखमींवर मोफत उपचार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

डोंबिवली (घेसरगाव) येथून खासगी बसने पंढरपूर येथे निघालेल्या वारकरी भक्तांच्या वाहनाला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *