Breaking News

नवी मुंबई मेट्रो उद्या शुक्रवार पासून धावणार, पंतप्रधान मोदी-मुख्यमंत्री शिंदे राहणार गैरहजर

१७ नोव्हेंबर २०२३ पासून नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र. १ वरील बेलापूर ते पेणधर दरम्यान मेट्रो सेवा सुरू होत असून नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न साकार होत आहे. मेट्रोच्या रूपाने नवी मुंबईकरांना जलद, पर्यावरणपूरक आणि आरामदायी परिवहनाचा एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार असून सीबीडी बेलापूरसह वेगाने विकसित होत असलेल्या खारघर, तळोजा नोड्सना मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभणार आहे. नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय शहर या लौकिकाला साजेशी उत्तम आणि सक्षम परिवहन व्यवस्था मेट्रोद्वारे निर्माण होणार आहे.

सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईमधील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीकोनातून नवी मुंबई मेट्रो प्रकल्प साकारण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण ४ उन्नत मार्ग विकसित करण्यात येत असून सिडकोतर्फे प्रथम बेलापूर ते पेंधर या ११.१० किमी लांबीच्या मार्ग क्र. १ चे काम हाती घेण्यात आले होते. सदर मार्गावर एकूण ११ स्थानकांसह तळोजा पंचनंद येथे आगार (डेपो) आहे. मार्ग क्र. १ ची अंमलबजावणी करण्याकरिता अभियांत्रिकी सहाय्य म्हणून सिडकोतर्फे महा मेट्रोची नियुक्ती करण्यात आली होती. मार्ग क्र. १ वर धावणाऱ्या मेट्रोच्या ऑसिलेशन, विद्युत सुरक्षा, ईमर्जन्सी ब्रेक इ. चाचण्या यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्या व त्याबाबतचे प्रमाणपत्रही संबंधित यंत्रणांकडून प्राप्त झाले. तद्नंतर मेट्रोच्या वाणिज्यिक परिचालनाकरिता (commercial operation) सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेली सीएमआरएस (मेट्रो रेल सुरक्षा आयुक्त) यांच्यातर्फे करण्यात आलेली चाचणीदेखील यशस्वीरीत्या पार पडून मार्ग क्र. १ वर प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरिता सीएमआरएस यांचे प्रमाणपत्रही प्राप्त झाले असून १७ नोव्हेंबर २०२३ पासून सदर मार्गावर मेट्रो सेवा सुरू होणार आहे.

अत्याधुनिक रचनेचे वातानुकूलित डबे, मेट्रो स्थानकांच्या दोन्ही (उत्तर व दक्षिण) बाजूने आगमन (एन्ट्री) आणि निर्गमनाची (एक्झिट) व्यवस्था आहे. मेट्रो स्थानकांवर पार्किंगसाठी जागा, दिव्यांग प्रवाशांकरिता रॅम्प, पदपथ (फुटपाथ), ऑटो रिक्षांकरिता जागा, अखंड वीज पुरवठ्यासाठी यूपीएससह डिझेल जनरेटरची (डीजी) व्यवस्था, कॉनकोर्स आणि फलाटांवर प्रवासी घोषणा प्रणाली, सीसीटीव्ही, दिव्यांग व्यक्तींसाठी कॉनकोर्स स्तरावर विशेष स्वच्छता गृहांची व्यवस्था, कॉनकोर्स परिसरात व्यावसायिक वापराच्या दृष्टीने दुकानांकरिता जागा, ही नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

ही मेट्रो सेवा १७ नोव्हेंबर २०२३ रोजी पेणधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेणधर दरम्यान दुपारी ३.०० वाजता सुरू होऊन शेवटची फेरी ही रात्री १०.०० वाजता असणार आहे. तर १८ नोव्हेंबर २०२३ पासून पेणधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेणधर दरम्यान सकाळी ०६.०० वाजता पहिली मेट्रो धावणार असून दोन्ही बाजूंकडून मेट्रोची शेवटची फेरी ही रात्री १०.०० वाजता होणार आहे. सदर मार्ग क्र. १ वर दर १५ मिनिटांच्या अंतराने मेट्रो धावणार आहे.

या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या तिकीटाचे दर हे अंतरानुसार पुढीलप्रमाणे असणार आहेत – ० ते २ किमीच्या टप्प्याकरिता रु. १०, २ ते ४ किमीकरिता रु. १५, ४ ते ६ किमीकरिता रु. २०, ६ ते ८ किमी करिता रु. २५, ८ ते १० किमीकरिता रु. ३० आणि १० किमीपुढील अंतराकरिता रु. ४० रूपये असा राहणार आहे.

सर्व नवी मुंबईकरांनी आपल्या दैनंदिन वापरासाठी नवी मुंबई मेट्रोच्या या वातानुकूलित, आरामदायी व निसर्गरम्य प्रवासाचा अनुभव घेऊन परवडणाऱ्या दरात सुखकर प्रवास करावा असे सिडकोतर्फे आवाहन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आपले अनुभव सिडकोच्या अधिकृत समाजमाध्यमांवरदेखील शेअर करावेत. सिडकोची अधिकृत समाजमाध्यमे खालीलप्रमाणे – फेसबुक – @CIDCO_Ltd, X – @CIDCO_Ltd व इन्स्टाग्राम – @cidco_ltd.

मेट्रो स्थानकांची नावे-

१. बेलापूर टर्मिनल

2. आरबीआय कॉलनी

3. बेलपाडा

4. उत्सव चौक

5. केंद्रीय विहार

6. खारघर गाव

7. सेंट्रल पार्क

8. पेठपाडा

9. अमनदूत

10. पेठाली – तळोजा

11. पेणधर

Check Also

घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेतील जखमींना अडीच लाखापर्यंतचे आर्थिक सहकार्य

वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळे घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील जखमी व्यक्तींच्या कुटुंबियांनात पालकमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *