Breaking News

एमएमआरडीएच्या माध्यमातून अलीकडच्या काळातील मुंबईतील सर्वात मोठे पुनर्वसन

प्रत्येक प्रकल्पबाधिताला हक्काचे घराचा अधिकार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
कुर्ला प्रिमियर कंपाऊंड येथे विमानतळ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत ९६१ प्रकल्प बाधितांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सदनिकांचे वितरणपत्र व चावी वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हे जनतेचे सरकार आहे. या भूमिकेतून शासन सर्वसामान्य नागरिकांचे रोटी, कपडा, मकान, आरोग्य या गरजा प्राधान्याने पूर्ण करत आहे. याच प्रयत्नातून आज संदेशनगर आणि क्रांतीनगर मधील नागरिकांना हक्काच्या घराचा अधिकार मिळाला आहे. सुमारे १२०० हून अधिक प्रकल्पबाधित जनतेला घरे देण्यात आली आहेत, असे सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, मुंबईला जागतिक दर्जाचं शहर बनवण्यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत घेत आहोत. येत्या काळात सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करणार असल्यामुळे शहर खड्डेमुक्त होणार आहोत. शहर सुशोभित करून आणि सर्व रखडलेले प्रकल्प हे एमएमआरडीए सारख्या यंत्रणांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येत आहेत. आज मेट्रोची सर्व कामे फास्टट्रॅकवर आहेत. त्यासोबतच कोस्टल रोड, अटल सेतू यांसारख्या प्रकल्पांमुळे शहर वाहतूक कोंडीमुक्त होत आहे.

एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले की, मुंबई महानगर प्रदेशातील प्रकल्प उभारताना त्याचा प्रकल्पबाधितांना विहित मुदतीत त्यांच्या हक्काची घर वेळेत देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. संदेशनगर आणि क्रांतीनगर येथील विमानतळ प्रकल्पबधितांचे पुनर्वसन करण्याची आमच्यावर सोपवलेली जबाबदारी आम्ही प्राधान्याने पार पाडत आहोत. या प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करताना अलीकडच्या काळातील मोठे पुनर्वसन करण्याचा आम्हाला आनंद होत आहे.

मुंबई शहरातील अलीकडच्या काळातील होणारे सर्वात मोठे पुनर्वसन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. कुर्ला प्रिमियर कंपाऊंड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विमानतळ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत ९६१ प्रकल्प बाधितांना सदनिकांचे वितरणपत्र व चावी वाटप करण्याचा शुभारंभ करण्यात आला. आहे. ज्यामध्ये कुर्ला प्रीमियर येथील इमारत क्रमांक २ मध्ये क्रांतीनगर मधील ४०६ प्रकल्प बाधितांना सदनिका मिळणार आहे. तर इमारत क्रमांक ३ मध्ये क्रांतीनगर मधील १६१ आणि संदेशनगर मधील ३९४ प्रकल्प बाधितांना घर मिळणार आहेत.

विमानतळ प्राधिकरणाच्या मुंबई येथील जागेवरील प्रकल्पबाधितांचे पुनर्वसनाबाबत, महाराष्ट्र शासनाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची प्रकल्प समन्वयक संस्था म्हणून नेमणूक केली आहे. त्यानुसार या सर्व प्रकल्पबाधितांचे कुर्ला प्रिमीयर येथील ३० इमारतींमधील १८ हजार ०८४ निवासी आणि अनिवासी सदनिकांमध्ये पुनर्वसन करण्यात येणार आहे. यापूर्वी काढलेल्या सोडतीमध्ये क्रांतीनगर आणि संदेशनगर येथील १२७ प्रकल्प बाधितांना सदनिका वाटप करण्यात आले आहे. पुनर्वसन करण्यात येणाऱ्या बाधितांची संख्या पाहता हे मुंबई शहरातील अलीकडच्या काळातील सर्वात मोठे पुनर्वसन ठरणार असल्याची माहिती एमएमआरडीए यांच्याकडून देण्यात आली.

Check Also

महाराष्ट्र लोकसेवा आयोग लवकरच ‘या’ परिक्षांच्या तारखा जाहीर करणार

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून लवकरच सुधारित परिक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *