भिवंडी येथील संकेत भोसले हत्या प्रकरणाचा पडसाद आज विधानसभेत उमटले. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि समाजवादी पार्टीचे रईस शेख यांनी या प्रकरणावरून राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. या प्रकरणी नेमकं काय घडलं कशावरून वाद झाला क्षुल्लक कारणावरून खून करण्यापर्यंत आरोपी जात असेल तर या प्रकरणाचा मास्टर माईंड कोण, राज्यात कायदा व सुव्यवस्था शिल्लक नाही. या सर्व प्रकरणाची सखोल माहिती द्यावी अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत केली. तर या हत्येमागे ड्रग्ज माफीया असल्याचा आरोप आमदार रईस शेख यांनी केला.
अर्थसंकल्पावर चर्चा चालू असताना समाजवादी पक्षाचे भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे भिवंडी येथील संकेत भोसले या १६ वर्षीय मुलाचा क्षुल्लक कारणावरून १४ फेब्रूवारी रोजी अतिशय़ अमानूषपणे खून करण्यात आला. त्याला कसा मारण्यात आला त्याचा व्हिडीओ माझ्याकडे आहे तो मी गृहमंत्र्याकडे पाठवितो. असे सांगत शेख यांनी या हत्येमागे ड्रग्ज माफिया असल्याचा आरोप करून या प्रकरणाची सखोल माहिती सभागृहासमोर आली पाहिजे. तसेच संकेत भोसलेच्या परिवाराला शासनाने २५ लाख रूपयाची मदत करावी अशी मागणी केली.
आमदार रईस शेख यांनी ही गंभीर बाब सभागृहात मांडल्यावर पिठासीन अधिकारी अमीन पटेल यांनी शासनाने नोंद घ्यावी असे सांगत पुढील कामकाजाकडे लक्ष वेधले असता कॉग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी इतकी गंभीर घटना राज्यात घडलेली असताना याची नोंद घेतली जात नाही याचा अर्थ काय, असा सवाल करीत या प्रकरणात नेमकं काय घडलं कशामुळे घडलं यामागे जर ड्रग्ज माफीया असतील तर सखोल चौकशी झाली पाहिजे. याची माहिती सभागृहाला मिळाली पाहिजे अशी मागणी केली. त्यानंतर पिठासीन अधिकारी अमिन पटेल यांनी शासनाने नोंद घेत सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यावर सभागृहात उपस्थित मंत्री गुलाबराव पाटील यांनी नोंद घेतल्याचे सांगितले.