महाज्योती संस्थेतर्फे संशोधन करण्यासाठी ओबीसी, भटके विमुक्त विद्यार्थ्यांना दिली जाणारी फेलोशिप मागील वर्षांच्या निकषात बसणाऱ्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना देण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारकडे केली.
गेल्या ३२ दिवसांपासून राज्यातील विविध भागातील ओबीसी व भटके विमुक्त प्रवर्गातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील संशोधक विद्यार्थी हे सर्व पात्र विद्यार्थ्यांना महाज्योती संस्थेतर्फे संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना दिली जाणाऱ्या फेलोशिप मिळावी, या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदान येथे उपोषणाला बसले आहेत. या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेऊन आपली समस्या मांडली. त्यावर दानवे यांनी याबाबत सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.
अंबादास दानवे म्हणाले, २०२३ मध्ये सुरुवातीला ५० विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा दुर्दैवी निर्णय घेण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर शासनाच्या वतीने २०० जागा करण्यात आल्या. मात्र अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १४५७ असून फेलोशिप केवळ २०० विद्यार्थ्यांना मिळाल्यास उर्वरित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
तसेच पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, संशोधनातर्फे एकप्रकारे राज्य व देशाचे नावलौकिक वाढत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता सरकारने याबाबत सकारात्मक पाऊल उचलून पात्र सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यावी, अशी मागणी सरकारकडे केली.