शिवचरित्राचे गाढे अभ्यासक, प्रखर शिवभक्त राजेश उर्फ राजू देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘अपरिचित साम्राज्याचा इतिहास’ घराघरात, मनामनात पोहोचविण्याचे भगिरथ कार्य केले आहे, हे कार्य असेच यापुढे सुरु ठेवून शिवरायांचा जाज्वल्य इतिहास सर्वत्र प्रसारित करावा, अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी राजू देसाई यांचा गौरव केला.
शिवभक्त राजू देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड या राजधानीवर पाचशे वेळा येऊन शिवभक्तांना शिवाजी महाराज यांची महती पटवून देऊन एक अनोखा विक्रम केला. या पाचशेव्या रायगड दर्शनाच्या निमित्ताने रायगडावर राजू देसाई आणि त्यांच्या पत्नी रेवा राजू देसाई या उभयतांना त्यांच्या मित्रमंडळातर्फे योगेश वसंत त्रिवेदी आणि माया योगेश त्रिवेदी यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ आणि मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराज यांची सुबक, आकर्षक, लोभस अशी प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.
राजू देसाई यांचा सन्मान करण्याएवढा मी मोठा निश्चित नाही. परंतु शिवभक्तांच्या वतीने फुल ना फुलाची पाकळी अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. राजू देसाई यांच्या कार्याची थोडक्यात माहिती देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे अस्तित्व जगासमोर आणणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांचीही रायगडावर प्रतिमा उभी करुन महाराष्ट्र शासनाने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या ५०० व्या रायगड दर्शन कार्यक्रमात रायगडावरील होळीच्या माळावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जगदीश्वर मंदिर येथेही सर्वांनी दर्शन घेतले, रायगडावरील बांधकामाचे शिल्पकार ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर’ या पायरीचेही दर्शन घेतले आणि महाराजांच्या समाधीसमोरही सारे नतमस्तक झाले. तसेच पाचाड येथे जाऊन राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन विनम्र अभिवादन केले.