Breaking News

धर्मादाय रुग्णालयांची माहिती आता ‘आरोग्य आधार’ ॲपवर मंत्री डॉ. तानाजी सावंत यांची माहिती

आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात सवलतीच्या दराने वैद्यकीय सेवा दिल्या जातात. या रुग्णालयांची अद्ययावत माहिती रुग्णांना ‘आरोग्य आधार’ या ॲपद्वारे तत्काळ मिळणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.

धर्मादाय रुग्णालयांतर्गत सुविधा रुग्णांपर्यंत पोहोचविणे, हॉस्प‍िटल रजिस्ट्रेशन पोर्टलचे सादरीकरण, एनएचएम पीआयपी २०२३-२४ सद्यस्थितीतील प्रगतीचा आढावा, आरोग्य संस्थांच्या बृहत आराखड्याचे सादरीकरण संदर्भात बैठकीचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते, यावेळी मंत्री डॉ. सावंत बोलत होते.

मंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले की, धर्मादाय रुग्णालयाच्या कार्याबाबत आदर्श कार्यप्रणाली तयार करताना पारदर्शी काम व्हावे, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. धर्मादाय रुग्णालयाची माहिती तत्काळ उपलब्ध व्हावी यासाठी, ‘आरोग्य आधार’ ॲप रुग्णांच्या सेवेत येणार आहे. या ॲपद्वारे रुग्णांना जवळचे धर्मादाय रुग्णालय, तिथे उपलब्ध असलेल्या सुविधा, उपलब्ध खाटांची संख्यांची माहिती तसेच तत्काळ खाट राखीव करता येणार आहे. वॉर रुम, आरोग्यदूत, धर्मादाय रुग्णालय आणि व्यवस्थापनाला यासंदर्भात माहिती एकाच वेळी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तालुकास्तरावर आरोग्य सुविधेसाठी तालुका किंवा जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार जिल्हा रुग्णालय, कर्करोग रुग्णालय, केमोथेरपी डे-केअर सेंटर, रेडिओ थेरपी ट्रिटमेंट युनिटसाठी प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले.

तसेच नर्सिंग होम ॲपमध्ये रुग्णालय आणि डॉक्टरांच्या प्रमाणपत्रांची त्रयस्थ पडताळणी करण्यात यावी. पदवीच्या सत्यतेची तपासणी करण्यात यावी, असे निर्देशही मंत्री डॉ. सावंत यांनी दिले.

भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, महिला व बाल आरोग्य केंद्र यांची मोजणी करण्यात आली आहे. केवळ अंतर आणि जिल्हा यानुसार केंद्रांची मागणी न करता जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राची मागणी करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही मंत्री डॉ. सावंत यांनी दिले.

बैठकीस आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त धीरजकुमार, धर्मादाय आयुक्त महाजन यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

राज्यात एकूण ११ हजार ५०२ सोनोग्राफी केंद्र: तक्रारदारास १ लाख रुपयांचे बक्षिस

गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्यांतर्गत राज्य सल्लागार समितीची बैठक पुणे येथील सहसंचालक कार्यालयात दूरदृश्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *