Breaking News

पुणे येथील सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला ‘प्रेसिडेंट्स कलर’ प्रदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुणे येथील सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला ‘राष्ट्रपतींचे निशाण’ (प्रेसिडेंट्स कलर) देऊन गौरविले. त्यांनी आभासी पद्धतीने ‘प्रज्ञा’ या सशस्त्र दलांच्या संगणकीय औषध उपचार केंद्राचे उद्घाटनदेखील केले.

यावेळी राज्यपाल रमेश बैस, देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख ले. जनरल ए. के. सिंह, सशस्त्र दल वैद्यकीय सेवेचे महासंचालक आणि आर्मी मेडिकल कॉर्पस् चे वरीष्ठ कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल दलजित सिंग, एएफएमसीचे संचालक तथा कमांडंट लेफ्टनंट जनरल नरेंद्र कोतवाल यांच्यासह संरक्षण दलांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु म्हणाल्या की, एएफएमसी अर्थात सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाने वैद्यकीय शिक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च गुणवत्ता असलेली शिक्षण संस्था म्हणून नावलौकिक मिळवला आहे. या संस्थेतून पदवीधर झालेल्यांनी युद्धाचा काळ, बंडविरोधी कारवाया, नैसर्गिक आपत्ती तसेच महामारीच्या काळात देशांतर्गत तसेच सीमापार भागात समर्पितपणे सेवा देऊन देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

एएफएमसी मधून पदवी मिळवलेल्या अनेक महिला सैनिकांनी सशस्त्र दलांच्या वैद्यकीय सेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे तसेच अत्यंत उच्च पदांवर काम केले आहे. या कामगिरीबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. या महिलांकडून प्रेरणा घेऊन, अधिकाधिक महिला सशस्त्र दलांमधील कारकिर्द निवडतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, आज आपण वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रीसीजन मेडिसिन, त्रिमितीय छपाई, टेलीमेडिसिन आणि इतर तंत्रज्ञानांचा वापर होताना पाहतो आहोत. सैनिकांना तंदुरुस्त तसेच युद्धासाठी सदैव सज्ज ठेवण्यात सशस्त्र दलाच्या वैद्यकीय सेवा विभागाने महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांना आपल्या तिन्ही सेनादलांतील कर्मचाऱ्यांना सर्वोच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा मिळेल याची सुनिश्चिती करून घ्यावी लागते, असे त्या म्हणाल्या.

एएफएमसीच्या पथकाने वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनावर अधिक भर द्यावा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा अशा सूचना राष्ट्रपतींनी दिल्या. एएफएमसीमधील कर्मचारी त्यांच्या कार्यात उत्कृष्टता आणण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करतील, असा विश्वासदेखील राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यक्त केला.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

अभ्यंगस्नान म्हणजे काय ? चला जाणून घेऊया

दिवाळीचा सण प्राचीन काळापासून साजरा केला जात आहे. दिवाळी म्हणजे प्रत्येकाला फराळ, मिठाई आणि फटाके …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *